आमचं पुढचं मिशन रविवारी रात्री 11 वाजता सुरू होणार आहे. या मिशनद्वारे चांद्रयान -3 चा परिघ कमी केला जाणार आहे. रविवारी ही प्रक्रिया सुरू केल्यानंतर 17 ऑगस्टपर्यंत आणखी तीन ऑपरेशन होतील.
बंगळुरू | 6 ऑगस्ट 2023 : भारतीय अंतराळ एजन्सी इसरोसाठी शनिवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. अनेक वर्षापासूनचं स्वप्न असेलल्या चांद्रयान-3 ने मोठी कामगिरी केली आहे. भारताचं हे तिसरं मानवरहित चांद्रयान आहे. या चांद्रयानाने शनिवारी संध्याकाळी पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. चंद्राच्या कक्षेत जाताच चांद्रयानाने इसरोला महत्त्वाचा संदेशही पाठवला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात आनंदोत्सव केला जात आहे.कोणत्याही अडथळ्यांशिवाय, कोणत्याही अडचणीशिवाय चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर यानाने एक महत्त्वाचा संदेश पाठवला आहे. मला चंद्राचं गुरुत्वाकर्षण जाणवत आहे, असा संदेश यानाकडून इसरोला आला आहे. हा संदेश आल्यानंतर इसरोतील संशोधकांचा आनंद गगनाला मावेनासा झाला. एक तर या संदेशातून चांद्रयान-3 सुखरूप चंद्राच्या परिघात पोहोचल्याचं स्पष्ट झालं. तसेच चंद्रावरील वातावरणाची माहितीही या संदेशाद्वारे मिळाली आहे. 22 दिवसांपूर्वी चांद्रयान -3 लॉन्च करण्यात आलं होतं. दक्षिणी ध्रुवा वर उतरण्यासाठी हे यान लॉन्च करण्यात आलं होतं.
इसरोने सॅटेलाईटमधून आलेला संदेश शेअर केला आहे. एमओएक्स, इस्ट्रॅक, हे चांद्रयान -3 आहे. मला चंद्रावरील गुरुत्वाकर्षण जाणवत आहे. आम्ही चंद्राच्या कक्षेत पोहोचलो आहोत, असं या संदेशात म्हटलं आहे. मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स, इसरो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क, बंगळुरूकडून हे यान लॉन्च केलं गेलं होतं.
600 कोटींचा खर्च
चांद्रयान-3 ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची होती. या मोहिमेसाठी 600 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अत्यंत परिश्रम घेऊन इसरोने हे मिशन तयार केलं होतं. त्याला मिळालेलं यश हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. 14 जुलै रोजी हे यान चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं. या यानाच्या सफरीचे अजून 18 दिवस बाकी आहेत. हे 18 दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक असल्याचं सांगितलं जातं.
चंद्रयानची कक्षा घटवली जाणार
आमचं पुढचं मिशन रविवारी रात्री 11 वाजता सुरू होणार आहे. या मिशनद्वारे चांद्रयान -3 चा परिघ कमी केला जाणार आहे. रविवारी ही प्रक्रिया सुरू केल्यानंतर 17 ऑगस्टपर्यंत आणखी तीन ऑपरेशन होतील. त्यानंतर रोवर प्रज्ञानसह लँडिंग मॉड्यूल विक्रम यानाच्या प्रपल्शन मॉड्यूलपासून वेगळा होईल. त्यांतर लँडर डी-आर्बिटिंगची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं इसरोने म्हटलं आहे.