घातक कच-याची विल्हेवाट लावण्याबाबत प्रचंड उदासीनता,. चाकणला महामार्गालगत जाळला जातोय कचरा,.
सत्यविचार न्यूज :
चाकण : प्रतिनिधी
उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीत अनेक मोठमोठे उद्योग आहेत. या उद्योगांना पूरक असे लघुउद्योगही चाकण पंचक्रोशीत आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात औद्योगिक घातक कचऱ्याची निर्मिती होत असून, या घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत प्रचंड उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे पुणे – नाशिक महामार्गावर चाकण गावच्या हद्दीत अगदी रस्त्यालगत कचरा जाळण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
चाकण भागातील अनेक मोठे लघुउद्योजक स्वतःच्या उदासीनतेमुळे कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता तो सरळ भंगारात विकत असल्याचे समजते. या कचऱ्यातील घातक रसायनही अत्यंत ज्वलनशील असतात. त्यामुळे कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने आगींना निमंत्रण मिळत असल्याचे निदर्शनात येत आहे. पुणे – नाशिक महामार्गावरून चाकण एमआयडीसीत सकाळी कामावर जाणारे कामगार व महिला घरातून निघतानाच घरात साचलेला ओला सुका हातात घेऊन निघतात. तो कचरा महामार्गावर दिसत असलेल्या कचऱ्याच्या ढिगावर फेकून देतात. या कचऱ्यातून दुर्गंधी सुटून त्याचा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. चाकण औद्योगिक भागात काही ठिकाणी रस्त्यावर साचलेला कचरा पेटवून दिला जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी कचऱ्यातून दुर्गंधी सुटत असल्याने नागरिक, प्रवाशी हैराण झाले आहेत.
” रस्त्यावर फेकला जात असणारा कचरा आणि एका जागेवर साठलेला कचरा याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. ओला सुका कचरा वेगळा केल्यास दुर्गंधी टळण्यास मदत होईल.” – मंदा लोखंडे, चाकण.