बेघरांच्या कबाला पावतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनास पाठविणार – दीपक ताटे
सत्यविचार न्यूज :
चाकण : प्रतिनिधी
भापसे पार्टीच्या माध्यमातून बेघर नागरिकांना राहण्यासाठी मिळणाऱ्या सरकारी एक गुंठा जागेचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बेघरांच्या कबाला पावतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनास तातडीने पाठवणार असल्याची ग्वाही भापसे पार्टीचे पक्षप्रमुख दीपक ताटे यांनी येथे दिली.
चाकण येथे बेघर नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात मार्गदर्शन करताना ताटे बोलत होते. या मेळाव्याला भापसे पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री ताटे, ज्येष्ठ नेते रमेश गालफाडे, प्रवक्ते जालिंदर उपाडे, युवक नेते धीरज ताटे, उत्तम लोंढे, राजेंद्र देढे, रामदास कांबळे, नितीन धाईंजे, विकास देढे, आकाश पाटोळे, लता गायकवाड, अपेक्षा भादवे आदींसह भापसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, बेघर नागरिक महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपक ताटे यांनी यावेळी सांगितले की, ” जिल्हा प्रशासनाने दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी ११२७ बेघर नागरिकांचे अ ब क ड प्रपत्र खेडच्या तहसीलदार कार्यालयात दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बेघर लाभार्थी नागरिकांचे प्रपत्र खेड तहसीलदार कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडे तातडीने दाखल करण्यात येणाऱ्या ११२७ बेघर नागरिकांच्या कबाला पावतीच्या प्रस्तावावर बेघरांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. सदर प्रस्ताव त्वरित जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात येणार आहे.” या महामेळाव्यात भापसे पार्टीचे पक्षप्रमुख दीपक ताटे व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री ताटे यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला.
जालिंदर उपाडे यांनी सूत्रसंचालन केले. समाधान ताटे व प्रवीण पाटोळे यांनी स्वागत केले. तर, धीरज ताटे यांनी आभार मानले.