शाळा तिथे ओळख ज्ञानेश्वरी उपक्रम सुरु व्हावा – प्रकाश काळे
ज्ञानगंगा इंग्लिश मिडीयम प्रशालेत ओळख ज्ञानेश्वरी उपक्रम सुरु
सत्यविचार न्यूज :
ओळख श्री ज्ञानेश्वरीची या संस्कारक्षम उपक्रमातून संत साहित्याचा प्रचार प्रसार शाळांतून केला जात आहे. शालेय मुलांवर संस्कारक्षम वयात चांगले संस्कार रुजविणे या हेतूने सामाजिक बांधिलकीतून समाज प्रबोधन केले जात आहे. ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार या माध्यमातून सुरु असलेला तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदीचे पालकत्व लाभलेला हा उपक्रम प्रत्येक गावागावांतील प्रत्येक शाळेत सुरु व्हावा असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी केले.
आळंदीतील ज्ञानगंगा इंग्लिश मिडीयम स्कुल प्रशालेत ओळख श्री ज्ञानेश्र्वरीची या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात हरिनाम गजरासह ”जय हरी माऊली” नामजयघोषात करण्यात आली. या प्रशालेत यावर्षी दुसरे शैक्षणिक पर्व सुरु होत आहे. यास मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी मार्गदर्शन करताना श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे बोलत होते.
ओळख ज्ञानेश्वरी परिवाराचे प्रमुख आणि श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे, प्राचार्य विजय गुळवे, सचिव वैष्णवी गुळवे, प्रा. महाराज बिरदवडे, सदस्य विलास वाघमारे, विश्वम्भर पाटील, कैलास आव्हाळे, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, राजेश नांगरे, ह.भ.प. अभिजित महाराज देशमुख यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रशालेत मागील सन २०२३ – २०२४ मध्ये यशस्वीपणे उपक्रम राबविण्यात आला. प्रशालेतून शालेय, मुले पालक आणि प्रशाला यांनी मोठा प्रतिसाद देत उपक्रमात सहभागी झाली. या उपक्रमाचे या शाळेतील हे सलग दुसरे वर्ष असून दर शनिवारी प्रा. बिरदवडे महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन, विवेचन शाळेत करून मुलांना संत साहित्य शिकवीत आहेत.
यावेळी अभिजित महाराज देशमुख यांनी जीवनात ज्ञानेश्वरी वाचन केल्यामुळे बाल मनावर कशा प्रकारे धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक मूल्य संस्कार होतात याबद्दल मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबासह आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ठिकाणांना एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमा विषयी आपले मनोगत व्यक्त केले. उपक्रमाच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत उपक्रमाची माहिती दिली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता हरिनाम गजरात झाली. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष प्राचार्य विजय गुळवे यांनी केले.