ज्ञानेश्वर विद्यालयातील ओळख श्री ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या पर्वातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
ओळख श्री ज्ञानेश्वरीची चतुर्थ पर्वाचे हरिनाम गजरात आळंदीत उदघाटन
सत्यविचार न्यूज :
शालेय विद्यार्थ्यांचे आदर्श जीवन घडविण्यास आवश्यक मूल्य व संस्कार देणारा एक संस्कारक्षम उपक्रम ओळख श्री ज्ञानेश्वरीच्या तृतीय पर्वातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ हरिनाम गजरात उत्साहात झाला. यामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी वडगाव शेरीचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे यांचे कडून सायकल तृतीय व चौथ्या क्रमांकासाठी स्व. ज्ञानेश्वर विठ्ठल हरपळे यांच्या स्मरणार्थ प्राजक्ता भोसले हरपळे यांच्या वतीने सायकल पाचव्या ते तेराव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन नंदा रवींद्र चव्हाण यांच्या वतीने सॅक स्कूल बॅग १५ ते २१ व्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांसाठी हेमांगी उपरे यांच्या वतीने टिफिन डब्बा तसेच एक ते आठ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांसाठी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या वतीने माऊलींची मूर्ती सार्थ ज्ञानेश्वरी हरिपाठ देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पालकां समवेत करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प.पू. विजय स्मिताजी म. सा. होत्या.
या प्रसंगी प.पू. प्रशांत ऋषीजी म. सा., श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त ह.भ.प. भावार्थ देखणे, आळंदी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तुकाराम खडके, गेल्या तीन वर्षापासून ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ चे अध्यापन करणारे ह.भ.प. सुभाष महाराज गेठे, ह.भ.प. भागवत महाराज साळुंके, संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, ओळख श्री ज्ञानेश्वरीची संकल्पना मांडणारे प्रकाश काळे, संस्थेचे सभासद अनिल वडगावकर, ज्ञानेश्वर मोळक, अर्जुन मेदनकर, राजेश नागरे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे विलास वाघमारे, सोपान काळे, धनाजी काळे, प्राजक्ता हरपळे,नणंद चव्हाण, कैलास आव्हाळे, पालक शिक्षक संघाच्या सहसचिव मनिषा केदार, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ नवीन पर्वाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात उपक्रमाचे साहित्य वाटप करण्यात आले. प्रास्ताविकात अजित वडगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमामुळे विद्यार्थ्यात होणारे सकारात्मक बदल व भविष्यात होणारा या उपक्रमाचा विस्तार तालुका, जिल्हा, राज्य किंवा देश या पुरता मर्यादित न राहता देशाच्या बाहेर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने गोरक्ष राख या विद्यार्थ्याने आपल्या मनोगतातून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आदर्श जीवन जगण्याचा स्त्रोत असून या उपक्रमातून आम्हा विद्यार्थ्यांना श्रवण व वाचन कसे करावे, एकाग्रता कशी साधावी, लहान थोरांशी कसे वागावे, बोलावे, स्मरणशक्तीचा विकास कसा करावा, स्वयंशिस्त कशी लावावी आदी मूल्यांचा विकास साधला जातो. म्हणून येणाऱ्या पर्वामधील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
प्रशांत ऋषीजींनी मोबाईल व इंटरनेटच्या युगात संस्कारक्षम गोष्टींच्या आवश्यकतेचे महत्व लक्षात घेऊन संस्था व शाळा विद्यार्थ्यांच्या आदर्श जीवनासाठी असे संस्कारक्षम उपक्रम राबवते ही खूप मोठी गौरवास्पद बाब असल्याचे सांगितले. त्याबद्दल ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे खजिनदार दीपक पाटील यांनी ज्ञानेश्वरीत शरीरासोबत मनाची एकाग्रता, अर्थ विचार, वैज्ञानिक शोधाचा वेध इत्यादीचे वर्णन केलेले असून ते ज्ञान विद्यार्थी जीवनात मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रकाश काळे यांनी ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचा अभ्यासक्रम, विद्यार्थी जीवनात अशा संस्कारक्षम उपक्रमाचे महत्त्व तसेच नोकरी मिळवण्याच्या शिक्षण प्रवाहात संस्काराची शिदोरी देणारा हा उपक्रम कृतिशील जीवन जगण्याचे माध्यम असल्याचे सांगितले. तसेच माऊलींचे साहित्य जगभर जावे व त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांनी ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनात आत्मिक समाधान देणारा असल्याचे सांगून उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी भावार्थ देखणे यांनी अभ्यासाच्या चार पायऱ्या सांगत संस्काराची महती देणारा हा उपक्रम असल्याचे सांगितले. आदर्श समाज घडण्याच्या उद्देशाने संतांनी जे जीवनमूल्य ठेवलेत ते सर्वांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगत पूर्ण देशात व परदेशात उपक्रम घेऊन जाण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली. मुख्याध्यापक दीपक मुंगसे यांनी आभार मानले. तत्पूर्वी आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांना आर्ट गॅलरी दाखवत संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी संस्थेतील उपक्रमांची माहिती देऊन संवाद साधला. सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदान गायनाने नामजयघोषात झाली.