अलंकापुरीत देशी गोवंश बचाव साठी बेमुदत उपोषणास प्रारंभ
गोभक्त मिलिंद एकबोटे यांचे उपोषण सुरु
सत्यविचार न्यूज :
तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर गोवंश संवर्धन, गोशाळा अनुदान, गायरान जमिनी गोचारा आणि गोशाळा यांना वापरास देण्यासह प्रति गायींना प्रतिदिन शंभर रुपये अनुदान, इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचे मागणीसाठी पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक व गोभक्त मिलिंद एकबोटे यांचे हरिनाम गजरात बेमुदत उपोषण सुरू झाले आहे.
यावेळी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, गोभक्त गणेश हुलावळे, नवनाथ शिंदे, भगवान कोकरे, संजय घुंडरे, आत्माराम महाराज शास्त्री अर्जुन मेदनकर यांचेसह राज्यातील गोशाळा चालक, गोभक्त, भाविक नागरिक उपस्थित होते.
राज्य शासनाने लाडकी बहिण अनुदान योजना सुरु करून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच धर्तीवर गोवंश संवर्धन, जतन उपक्रमात लाडकी गायी,गोमाता अशी योजना सुरु करून प्रति गायी, प्रतिदिन १०० रुपये अनुदान देण्यात यावे. अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी विविध मागण्यांसाठी आळंदीत गोभक्त मिलिंद एकबोटे यांचे उपोषण सुरू झाले असून देशी गोवंश बचाव साठी जनआंदोलन अखिल भारत कृषी गोसेवा संघ, पश्चिम महाराष्ट्रच्या वतीने आळंदीत गोभक्त माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांचे समवेत गोभक्त देशी गोवंशाचे संरक्षणार्थ तसेच राज्यातील गोशाळा यांना अनुदान आणि गायींसाठी गायरान जमिनी मिळाव्यात या मागण्यांसाठी गुरुवार पासून ( दि. १९ ) बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. गोभक्त माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांनी हरिनाम गजरात गायी मूर्तीची पूजा, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करून उपोषण सुरु केले.
राज्यातील गायरानाची जमिन गोपालन, चारा लागवड यासाठी उपलब्ध करून देणे, रस्त्यावरील मोकाट फिरणाऱ्या गोवंशाच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना, इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणे अशा विविध मागण्याचा समावेश या उपोषण आंदोलनात असल्याचे मिलींद एकबोटे यांनी सांगितले. श्रीक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर उपोषण सुरू झाले असून या आंदोलनात सर्वानी सहभागी होऊन गोवंश वाचविण्यास पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सर्वत्र शेतीसह आरोग्यास उपयुक्त असलेल्या गोवंशाच्या संरक्षणास महाराष्ट्र शासनाने अनुदान देऊन गायींना राजाश्रय द्यावा. इतर राज्या प्रमाणे जसे कि, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांत देशी गोवंशाच्या पालनास अनुदान दिले जाते. त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यांत देखील गायीचे संरक्षणार्थ अनुदान मिळाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्यात आम्ही महायुतीचे समर्थक आहोत. गोमातेच्या आस्थे पोटी शासनाने याकडे लक्ष वेधण्यासाठी पर्याय नसल्याने उपोषण करीत न्याय मिळविण्यासाठी दाद मागत आहे. गोरक्षक, गोशाळा चालक, गोभक्त ,भाविक, नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गणेश हुलावळे यांनी केले आहे. यावेळी भगवान कोकरे महाराज, आत्माराम शास्त्री महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हरिपाठ, इंद्रायणी आरती भोलापुरी महाराज यांचे उपस्थितीत झाली. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांचे मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त शांतता सुव्यवस्था यासाठी तैनात करण्यात आला आहे.