गोडाऊन समोर दारू पिणाऱ्या दोघांना इथे दारू (Wakad ) पिऊ नका असे सांगितले असता फर्निचर व्यावसायिकाला दोघांनी त्यांच्या अन्य साथीदारांसोबत मिळून मारहाण करत खुनी हल्ला केला. यामध्ये व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 1) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारासमानकर चौक, वाकड येथे घडली.
मोहम्मद शाहजाद मोहम्मद शफिक अन्सारी (वय 40, रा. वाकड. मूळ रा. सहारनपुर, उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगेश कस्पटे, अभिषेक कस्पटे, जयेश कस्पटे, दत्ता पाटील, बालवडकर, पवन (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी अभिषेक कस्पटे याचे गोडाऊन भाड्याने घेतले आहे. तिथे ते फर्निचरचे काम करतात.
रविवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या गोडाऊनकडे जात असताना आरोपी त्यांच्या गोडाऊनच्या शेजारी असलेल्या मंगेश कस्पटे याच्या गोडाऊन समोर दारू पीत बसले होते.
फिर्यादी यांनी त्यांना इथे दारू पिऊ नका, असे सांगितले. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना कानशिलात मारून शिवीगाळ केली.
त्यानंतर अन्य आरोपींना बोलावून फिर्यादी यांना कोयता, रॉड, दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
यात फिर्यादी यांच्या डोक्याला, हाताला व अंगावर ठिकठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी अभिषेक कस्पटे आणि पवन या दोघांना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास (Wakad ) करीत आहेत.