चाकण येथे रविवारी न्यायवैद्यक
शास्त्रावर नऊ सत्रात कार्यशाळा,.
चाकण : प्रतिनिधी
चाकण डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने चाकण जवळील वाकी बुद्रुक ( ता. खेड ) येथे रविवारी ( दि. २५ ) न्यायवैद्यक शास्त्रावर आधारित नऊ सत्रात एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली असल्याची माहिती चाकण डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. असित अरगडे यांनी दिली.
पुणे – नाशिक महामार्गावरील चाकण नजीक वाकी बुद्रुक येथील राजरत्नच्या सभागृहात वरील नियोजित दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री (राज्य) तथा आयुषमंत्री प्रतापराव जाधव व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते व खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी न्यायवैद्यक क्षेत्रातील तज्ञ एड. ज्योती भाकरे, एड. मकरंद आडकर, एड. अमित कारखानीस, डॉ. मंदार रानडे, डॉ. मिलिंद सोनवणे, डॉ. दिलीप वाळके, एड. अरुण मिश्र, डॉ. अंजली दुधगावकर आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी चाकणसह खेड, आळंदी, आंबेगाव व जुन्नर तालुका तसेच पिंपरी – चिंचवड मधील नामांकित असे एकूण चारशेहून अधिक तज्ञ डॉक्टर्स या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.
चाकण डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. असित अरगडे यांच्या संकल्पनेतून प्रथमच उत्तर पुणे जिल्ह्यात या अभिनव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.विक्रम शेवाळे, डॉ. सुप्रिया भाटकर, डॉ. अमोल बेनके, डॉ. तुषार गोरे, डॉ. सागर पाटील, डॉ. प्रशांत शेलार, डॉ. सागर सोमवंशी, डॉ. देवीराज पाटील, डॉ. सतीश कुलकर्णी आदींनी या कार्यशाळेचे आयोजन व संयोजन केले आहे.
” एकविसाव्या शतकात वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन शोध लागत आहेत. या नवीन माहितीचा अभ्यास करण्याकरिता व सर्व डॉक्टरांचे ज्ञानवर्धन होण्याकरिता चाकण डॉक्टर्स असोसिएशन नेहमीच सक्रिय असते. त्याच बरोबर डॉक्टरांवर होणारे भ्याड हल्ले, कोलकाता, बदलापूर, पोरशे प्रकरणा सारख्या घातकी घटना, कायदेशीर तक्रारी तसेच वाढत्या हलगर्जीपणा बद्दलचे गुन्हे यांपासून वाचण्याकरिता आजच्या काळात डॉक्टरांचे कायदेविषयक ज्ञान अत्यावश्यक झाले आहे.” – डॉ. असित अरगडे, अध्यक्ष, चाकण डॉक्टर्स असोसिएशन,.