भात उत्पादक शेतक-यांनी यांत्रिकी भात शेतीवर भर दयावा – नंदकुमार वाणी, (तालुका कृषि अधिकारी, खेड)
महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पुणे अंतर्गत खेड तालुक्यातील पश्चिम भागात यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिके जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पुणे संजय काचोळे व प्रकल्प उपसंचालक आत्मा पुणे श्रीधर काळे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहेत.या अंतर्गत मौजे-साकुर्डी येथे प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब कडलग यांचे शेतावर यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिकांचा शुभारंभ नंदकुमार वाणी, तालुका कृषि अधिकारी, खेड यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी मंडळ कृषि भाऊसाहेब मराडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिनेश सावंत, कृषि पर्यवेक्षक संदिप आहेर , कृषि सहाय्यक संतोष गोसावी प्रगतिशिल शेतकरी रामदास लांडगे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी वाणी यांनी सांगितले कि,खेड तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख पिक हे भात आहे. भात शेतीसाठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मजुरांची कमतरता जाणवत आहे व योग्य पाऊस झाला की प्रत्येक शेतकऱ्यांची भात लागवाढीची लगबग सुरु होते त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांनी यांत्रिकी भात लागवडीचा अवलंब मोठ्या प्रमाणात करावा.यंत्राद्वारे भात लागवड केल्यामुळे लागवड खर्चात बचत होते व योग्य वयातील रोपांची लागवड केल्यामुळे उत्पादनात वाढ होते त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करावा.यंत्रामुळे शेतकर्यांची वेळ, बियाणे, मजुरी इत्यादीत मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचे संगितले.
यंत्राद्वारे भात लागवड केल्यामुळे होणारे फायदे पाहिल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात यांत्रिकी भात शेतीकडे वळत आहेत व त्यांना कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),खेड यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असलेबाबत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिनेश सावंत यांनी माहिती दिली.