माती परीक्षणात विद्यार्थीनी केले मातीचे विश्लेषण उत्साहात
सत्यविचार न्यूज :
दीपगृह अकादमीने माती परीक्षण उपक्रमाचे आयोजन उत्साहात केले होते. यात देऊळगाव गाडा चौफुला येथे असलेल्या दीपगृह अकादमीच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी जवळपास पंचक्रोशीतील सहा गावांतील शेतकऱ्यांनी आणलेल्या नमुन्यांची माती परीक्षण ( माती विश्लेषण ) केले. ही पहिली शाळा आहे. जिथे शेती हा विषय शिकवला जातो.
मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमा सोबतच विद्यार्थ्यांना माती परीक्षण कसे करावे, त्याचे महत्त्व कसे समजून घ्यावे आणि अहवाल कसे तयार करावे हे शिकवले जाते. यापूर्वी, विद्यार्थ्यांनी माती परीक्षणासाठी जवळपासच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातही भेट दिली होती. शेतकऱ्यांच्या जमिनीतील मातीच्या आरोग्याचे विश्लेषण करण्यासाठी आणि त्याची सुपीकता सुधारण्यासाठी माती परीक्षण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. निरोगी जमिनीसाठी आवश्यक पोषक तत्वे समजून घेण्यावर भर देण्यात आला. चाचणी दरम्यान, विद्यार्थ्यांनी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सेंद्रिय कार्बन, पीएच आणि विद्युत चालकता यासारख्या घटकांची तपासणी केली. माती परीक्षण का आवश्यक आहे, त्याचे शेतीसाठी दीर्घकालीन फायदे, आणि पोषक तत्वांच्या कमतरतेवर आधारित खतांचा योग्य प्रमाणात वापर कसा करावा हे समजून घेण्यास मदत करणे हा मुख्य उद्देश होता.
विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात घेतलेली पिके आणि शेतकऱ्यां समोरील आव्हाने, समस्यांची माहितीही गोळा केली. आजूबाजूच्या सहा गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमास पाठिंबा देण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी स्वप्नील बनकर, कृषी पर्यवेक्षक शिवाजी चांदगुडे, कृषी सहायक अधिकारी गणेश कदम, दिलीप यादव, कृषी सहायक अधिकारी, पाडळी महेंद्र कुदळे,सहायक कृषी तंत्रज्ञ महेश रुपनवार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.