चाकणला देखावे पाहण्यासाठी
गणेशभक्तांची तोबा गर्दी,.
चाकण : प्रतिनिधी
चाकणला यंदा ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक व जिवंत देखावे सादर करण्यावर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी भर दिला आहे. देखावे पाहण्यासाठी चाकण शहरात अबालवृद्धांसह तरुणाई व गणेशभक्तांनी तोबा गर्दी केल्याने चाकण बाजारपेठ फुलून गेली आहे.
येथील ९८ व्या वर्षात पदार्पण केलेल्या श्री समस्त बालवीर मंडळाने या मंडळाचे अध्यक्ष व जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष संजय नारायण वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली ” विष्णू भक्त – भक्त प्रल्हाद ” हा चलत व हलता देखावा सादर केला आहे. परंपरेनुसार या मंडळाने पहिल्या दिवसांपासूनच देखावा सादर करण्यास प्रारंभ केल्याने गर्दी वाढू लागली आहे. येथील मार्केटयार्ड गणेशोत्सव मंडळाने यंदा ” हिरण्यकश्यपुचा वध ” हा देखावा सादर केला आहे. तर येथील गोल्डन चौकातील नवयुग मित्र मंडळाने यंदा ” गुड टच – ब्याड टच, काळाची गरज ” हा जिवंत देखावा सादर केला आहे. या मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वाव्हळ व उद्योजक मंगेश कांडगे यांच्या संकल्पनेतून हा देखावा सादर केला जात आहे. चाकणमध्ये यंदा विद्युत रोषणाईच्या झगमगाटात गणेश भक्तांचा उत्साह विशेष पर्वणी ठरत आहे. माणिक चौकातील आझाद हिंद मंडळ, श्री चक्रेश्वर तरूण मंडळ, संग्राम दुर्ग मित्र मंडळ, महात्मा फुले मित्र मंडळ, श्री संत सावतामाळी समाज तरूण मंडळ, यंग जाॅली क्लब, श्री बाल गणेश मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ, श्री संत सावतामाळी महाराज मित्र मंडळ, शिवगर्जना मित्र मंडळ, मयूर मित्र मंडळ आदि मंडळांनी समाज प्रबोधनपर देखावे सादर केले आहेत.
गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असून, काही मंडळांनी विद्युत रोषणाईवर भर दिला आहे. येथील १०५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या यंग ज्वाली क्लबने मंडळाचे अध्यक्ष अनिल जगनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ” शिश महल ” हा देखावा सादर केला आहे. प्रा. संजय वाडेकर, अनिल जगनाडे, राजेश जगनाडे, मंगेश कांडगे, नितीन गोरे, शशिकांत जाधव, निखील धाडगे आदि कार्यकर्ते व पदाधिकारी देखावे सादर करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.