सत्यविचार न्यूज :
चाकणला डोळ्यांचे पारणे फेडणारी गौराइंची आरास,.
महिलांची उडाली झुंबड,.
चाकण : प्रतिनिधी
वाद्यवृंदाच्या गजरात गणरायाचा प्रतिकात्मक देखावा सादर करून सोनपावलांनी घरोघरी आलेल्या आणि गौराइंच्या स्वागतासठी करण्यात आलेली सजावट, आरास पाहण्यासाठी चाकण शहरामध्ये महिलांची अक्षरशः झुंबड उडालेली चाकणकर नागरिकांना पाहावयास मिळाली. गणरायांचे देखावे आणि त्यात गौराइंचे आगमन यामुळे चाकण बाजारपेठ दिवसभर फुलून गेली आहे.
गणरायाचा प्रतिकात्मक जनजागृतीपर देखावा, लेक वाचवा, पर्यावरण वाचवा व पाणी बचतीचा संदेश देत चाकणसह परिसरात घराघरात आनंदात आणि चैतन्यमय वातावरणात सोनपावलांनी गौराईंचे आगमन झाल्याने गौराईंची सजावट व आरास पाहण्यासाठी महिला व तरूणींनी मोठी गर्दी केली होती. लक्ष्मीच्या स्वागताची यंदा जोरदार तयारी केल्याचे सेजल जगनाडे, राजश्री जगनाडे, सुनिता जगनाडे, मालती जगनाडे आदींनी सांगितले. गौरीच्या सजावटीसाठी साड्या, दागदागिने आदी गोष्टींची तयारी यापूर्वीच करण्यात आल्याचे शितल जगनाडे व योगिनी जगनाडे आदींनी सांगितले. तळ्यावरील खड्यांना गौरीच्या रूपात काहींनी घरी आणले. तर कोणी पानफुलांच्या रूपाने गौरीला घरी आणल्याचे माधुरी गोसावी व रेश्मा गोसावी यांनी सांगितले. गौराईला केलेल्या सजावट व आरासच्या माध्यमातून अनेक महिलांनी घरोघरी ” गणरायाचा प्रतिकात्मक देखावा, दुष्काळ मानव निर्मित कि निसर्ग निर्मित, पर्यावरण वाचवा,” आदींवर समाज प्रबोधन देखावे सादर करून, लेक वाचवा, पाणी वाचवा व प्रदूषण टाळा. असा समाजाला संदेश दिला आहे.