चाकण येथे सोमवार पासून युगात्मा
शरद जोशी वैचारिक व्याख्यानमाला,.
चाकण : प्रतिनिधी
उद्योजक अभिमन्यू शेलार मित्र परिवार व चाकण शिक्षण मंडळाचे येथील कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण येथे सोमवार ( दि. २ सप्टेबर ) ते बुधवार ( दि. ४ सप्टेबर, २०२४ ) या सलग तीन दिवसांच्या कालावधीत योद्धा शेतकरी युगात्मा शरद जोशी वैचारिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्याची माहिती महाशिवार एग्रोचे अध्यक्ष व युवा उद्योजक अभिमन्यू शेलार व चाकण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश लाटणे यांनी दिली.
चाकण येथे गेल्या अकरा वर्षापासून चाकण शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय व युवा उद्योजक अभिमन्यू शेलार मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी सलग तीन दिवशीय या वैचारिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यंदा या व्याख्यानमालेचे बारावे वर्षे आहे. येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात वरील नियोजित दिवशी सकाळी नऊ ते अकरा या वेळात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी ( दि. २ ) संगमनेरमधील मालपाणी उद्योग समूहाचे संचालक व प्रसिद्ध विचारवंत डॉ. संजय मालपाणी हे दीपप्रज्वलन करून या व्याख्यानमालेचा शुभारंभ करणार आहेत. डॉ. मालपाणी हे यावेळी ” रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ” या विषयावर मार्गदर्शन करून व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत.
मंगळवारी ( दि. ३ ) दर्यापूर अमरावती येथील शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय यशवंत विल्हेकर हे ” शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील अनुभव ” या विषयावर मार्गदर्शन करून दुसरे पुष्प गुंफणार आहेत.
बुधवारी ( दि. ४ ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रीरंजन आवटे हे ” संविधान – आपलं आयकार्ड ” या विषयावर मार्गदर्शन करून अखेरचे पुष्प गुंफणार आहेत.
या व्याख्यान कार्यक्रमाला महाशिवार अग्रोचे चेअरमन अभिमन्यू शेलार, चाकण शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अविनाश अरगडे, विश्वस्त मोतीलाल सांकला, डॉ. असित अरगडे, विश्वस्त अतुलचंद्र कुलकर्णी, उद्योजक संतोष सांकला, सनदी अधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, राजू दीक्षित, प्राचार्य डॉ. राजेश लाटणे, उद्योजक रामचंद्र कड, समन्वयक प्रा. डॉ. शिवाजी एंडाईत, सहसमन्वयक डॉ. उमेश भोकसे आदींसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, महाविद्यालयीन युवक, युवती उपस्थित राहणार आहेत.