महिला व विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी पोलीस कटिबध्द – राजश्री कराळे
सत्यविचार न्यूज :
मंचर – सध्या लहान मुली, विद्यार्थिनी तसेच महिलांवर होणारे अत्याचार व हल्ले यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याबाबत विद्यार्थिनी मुली व महिलांनी काळजी घेणे गरजेचे असून त्यांच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासन कटिबध्द असल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याच्या पोलीस उप निरीक्षक राजश्री कराळे यांनी सांगितले.
सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मंचर (ता. आंबेगाव) येथील डॉ. मुमताज अहमद खान शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्भय कन्या अभियानांतर्गत आयोजिन व्याख्यान प्रसंगी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना राजश्री कराळे बोलत होत्या.
यावेळी कराळे यांनी महिला सुरक्षिततेबाबत असणारे कायदे व विविध कलमे याबाबत उपस्थित विद्यार्थिनींना माहिती दिली.
मुली अथवा महिलांचा पाठलाग करणे, त्यांच्याकडे बघून अश्लील हावभाव करणे, त्यांच्याशी असभ्य वर्तन करणे, जाणीवपूर्वक त्यांना त्रास देणे, त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करणे, प्रसार माध्यमांद्वारे त्यांना बदनाम करणे यासारखे प्रकार काही समाजकंटकांकडून केले जात आहेत. असा काही प्रकार घडत असल्याचे लक्षात येताच मुली, विद्यार्थिनी तसेच महिलांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही कराळे यांनी याप्रसंगी केले.
पोलिसांवर सध्या कामाचा प्रचंड ताण असून त्यांना सध्या विविध प्रकारची कामे पार पाडावी लागत आहेत. त्यामुळे लहान मुली, विद्यार्थिनी तसेच महिलानी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन स्वतःच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्राचार्य अनंत बोरकर यांनी या प्रसंगी केले.
या कार्यक्रमाला महिला पोलीस वैशाली कराळे, मनिषा शेळके, संस्थेचे सचिव शाहीद सय्यद, खजिनदार मन्सूर शेख,, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. अनिल निघोट, प्रा. अशीर शेख, रजिस्ट्रार गनी शेख, संतोष गाडेकर, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. अनिल निघोट यांनी, सूत्र संचालन प्रा. कैलास जाधव यांनी केले. तर प्रा. संदीप ढोकणे यांनी आभार मानले.