Chakan : चाकण परिसरातील उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन सकारात्मक
पुणे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार (Chakan)जिल्हा उद्योग केंद्र व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजची बैठक पार पडली. बैठकीत औद्योगिक वसाहती मधील अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. सर्व अडचणी सोडविण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
या बैठकीस पुणे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक वृषाली सोने, एरिया मॅनेजर एमआयडीसी शिवा राठोड, सारंग साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मिलिंद बारभाई, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, एनएचएआयचे एस आर जोशी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल, सारंग जोशी, बॉसचे विजयसिंह राजपूत, बजाजचे गुंजन खलाने, हुंडाईचे प्रकाश धोंगडे, एआरएआयचे अजय रोपाळेकर, टेनाकोचे तुषार पवार यांच्यासह 70 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
एआरएआय कंपनीचे अजय रोपळेकर यांनी सांगितले की, एआरएआय व एरेमोंड कंपनीच्या जवळ निघोजे ग्रामपंचायत मोकळ्या जागेत कचरा आणून टाकत आहे. त्यामुळे या परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ताबडतोब निघोजे ग्रामपंचायतला सांगून हा कचरा उचलून त्या ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई करावी. यावर जिल्हा उद्योग केंद्राच्या वृषाली सोने यांनी सांगितले की, संबंधित विषय एमपीसीबीच्या व एमआयडीसीच्या प्रतिनिधींना सांगून त्यावर योग्य कार्यवाही केली जाईल.
चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर अतिक्रमण झाले असून यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते व अपघातही होत आहेत. हे अतिक्रमण ताबडतोब काढणे गरजेचे आहे. त्यावर पोलीस विभागाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, हे अतिक्रमण काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यावेळी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे सचिव दिलीप बटवाल यांनी विनंती केली की, या अतिक्रमण काढून टाकलेल्या जागेवर ताबडतोब डांबरीकरण करण्यात यावे जेणेकरून पुन्हा तेथे अतिक्रमण होणार नाही व रस्ते सुद्धा मोठे होतील. त्यावेळी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी, आम्ही ताबडतोब या रस्त्यांचे डांबरीकरण करणार असल्याचे आश्वासन दिले.
चाकण परिसरातील रस्त्यांवर एमआयडीसी, एनएचआय व पीडब्ल्यूडी यांच्या हद्दीतील रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. हे रस्ते वाहन चालवण्या योग्य राहिलेले नाहीत म्हणून ताबडतोब या रस्त्यांवरील खड्डे भरून काढणे गरजेचे आहे. त्यावर पीडब्ल्यूडी, एनएचएआय व एमआयडीसीच्या प्रतिनिधींनी येणाऱ्या दहा-बारा दिवसात सर्व खड्डे भरून काढले जातील असे आश्वासन दिले.
पुण्यातील रस्त्यांवर बीआरटीसाठी वेगळा कॉरिडॉर बनवलेला आहे. त्यात खाजगी वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. हे कमी करण्यासाठी कंपन्यांचे प्रतिनिधींनी सांगितले की, कंपन्यांच्या शिफ्ट सुरू होण्याच्या व संपण्याच्या काळात बीआरटीमध्ये कंपनीच्या बसेस ना परमिशन देण्यात यावी. त्यावर वृषाली सोने यांनी सांगितले, या विषयावर पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांशी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू.
यावेळी अनेक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीरपणे मोठी वाहने पार्क केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात वाढत आहेत. त्यासाठी या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी सदर वाहनांवर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आले की, एमआयडीसी मध्ये ट्रक टर्मिनल ताबडतोब सुरू करावे. त्यावेळी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे सचिव दिलीप बटवाल म्हणाले, चाकणचे ट्रक टर्मिनल सुरू झाले असून आता हे ट्रक टर्मिनल पूर्ण क्षमतेने वापरले जात आहे. त्यात आता मोठ्या संख्येने वाहने पार्क होत आहेत. आता वाहने पार्क करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही.
एमआयडीसीने या ट्रक टर्मिनलची क्षमता वाढवावी जेणेकरून जास्तीत जास्त वाहने त्यात पार्क होतील, या पोलिसांच्या सूचनेवर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही टर्मिनलचा एरिया वाढण्यासाठी ताबडतोब प्रयत्न करू व या ट्रक टर्मिनलची क्षमता वाढवू.
एमआयडीसी फेज दोन मधील रस्त्यावर वाहनांची गर्दी होत असून वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी व या रस्त्यावरील लोड कमी करण्यासाठी जीई कंपनीकडून एनडीआरएफ व सदुंबरे गावाकडून चाकण तळेगाव रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचे रस्त्याचे काम करून दुहेरी करण्यात यावा. त्यामुळे या रस्त्यावरील वापर होऊन एमआयडीसी फेज दोन मधील रस्त्याचे कमीत कमी 25 टक्के ट्राफिक या रस्त्यावर शिफ्ट होईल व ट्रॅफिक जाम कमी होईल. त्यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या सोने म्हणाल्या की, आगामी बैठकीत संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना बोलवून योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातील.
एमएससीडीसीएलच्या पावर सप्लाय मध्ये खूप प्रश्न निर्माण झाले असून अनेक वेळा पावर फेल्यूअर, डीप येणे, विजेचा लपंडाव अशा समस्यामुळे कंपन्यांचे मालाचे व यंत्रांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्याचबरोबर प्रोडक्शनवर याचा विपरीत परिणाम होत आहे. म्हणून त्यावर उपाय करण्यासाठी पावर सप्लाय सुधारण्यात यावा. फेडरेशनचे दिलीप बटवाल यांनी सांगितले, या परिसरातील कंपन्यांना अविरत पावर सप्लाय मिळण्यासाठी या विभागाचे विभागीय संचालक श्री खराडे यांच्यासोबत आपण लवकरच बैठक घेऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढू.
बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी ट्राफिक जाम दिवसेंदिवस वाढले चालले असून त्यावर उपाय योजनेसाठी चाकणला मेट्रो सुरू करण्यात यावी अशी विनंती केली. त्यावर दिलीप बटवाल यांनी सांगितले की, नाशिक फाटा ते चाकण ही मेट्रो मंजूर असून निगडी ते चाकण एमआयडीसी हंटस्मन चौक या रस्त्यावरील मेट्रोचे डीपीआर बनवण्याचे काम सुरू आहे. लवकरच या मेट्रो सुरू होतील अशी आशा आहे.
बरेच औद्योगिक कर्मचारी हे कामासाठी पुणे व पिंपरी चिंचवडहून चाकणला येजा करत असतात त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी चाकणमध्ये उत्कृष्ट प्रकारच्या हाउसिंग सोसायटी, शाळा, कॉलेज, मनोरंजन केंद्रे, मॉल, पाणी इत्यादी सोयी झाल्या तर हे कर्मचारी चाकण मध्येच राहतील. त्यामुळे ट्रॅफिक वरील लोड कमी होईल. त्यावर दिलीप बटवाल यांनी सांगितले की, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने संबंधित विभागांना पत्रव्यवहार करून होऊ घातलेल्या रिंग रोड मध्ये चाकणच्या जवळपास अशी केंद्रे उभी व्हावीत जेणेकरून कर्मचारी अशा ठिकाणी राहण्यास जातील व वॉक टू वर्क हे कल्चर चाकण मध्ये आणता येईल असा पत्रव्यवहार केला गेला आहे. लवकरच चाकण मध्ये हे सुरू होईल अशी सरकारकडून आशा आहे.
चाकण मध्ये अस्तित्वात असलेले रोड कमी पडत असून त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांचा लोड येत आहे. ज्यामुळे ट्राफिक जाम होते. हे ट्राफिक जाम कमी करण्यासाठी खालील कनेक्टिंग रोड निर्माण केल गेले तर अस्तित्वात असलेल्या रोडवरील लोड कमी होऊन ट्राफिक जाम कमी होण्यास मदत होईल. नानेकर वाडी ते बॉस कंपनी, चाकण एमआयडीसी फेज तीन ते निघोजे मार्गे चिखली, आंबेठाण ते महाळुंगे, खराबवाडी ते डब्ल्यूएमडीसी, पुणे नाशिक हायवे व तळेगाव चाकण रस्त्यावरील ट्राफिक जाम कमी करण्यासाठी शिरोली येथून किवळे मार्गे कोरेगाव फाटा येथे रस्ता करण्यात यावा, किवळे कोरे रोड मार्गे धामणे गावातून करंज विहार येथे रस्ता करण्यात यावा, चाकण बाहेरून वाकी पासून आंबेठाणकडे जाणारा रस्ता कोरेगाव वासुली मार्गे तळेगावला जोडण्यात यावा, एमआयडीसीतील ट्राफिक कमी करण्यासाठी तळवडे आयटी पार्क पासून मॅरिएट हॉटेल पर्यंत नवीन रस्ता तयार करण्यात यावा. यावर जिल्हा उद्योग केंद्राच्या श्रीमती सोने म्हणाल्या की, हे सर्व रोड आपण येणाऱ्या मीटिंगमध्ये संबंधित विभागांना बोलवून चर्चा करून तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील.