रत्नाई महाविद्यालयात तीन दिवसीय राष्ट्रचेतना युवा उत्सवाचे आयोजन
सत्यविचार न्यूज :
राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे रत्नाई महाविद्यालय आणि कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कला विभाग अंतर्गत ‘राष्ट्रचेतना युवा उत्सव’ विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला. या उत्सवाचे यंदाचे हे पहिले वर्ष असून विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमानाच्या जाणिवा आणखी समृद्ध करण्यासाठी ७८ वा स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून दि.१२,१३,१४ ऑगस्ट,२०२४ या तीन दिवसांत महाविद्यालयाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांच्या शुभहस्ते या उत्सवाचे उदघाटन पार पडले आणि विद्यार्थ्यांच्या काव्य वाचन स्पर्धेने राष्ट्रचेतना युवा उत्सवाला सुरुवात झाली यावेळी प्राचार्य आणि प्राध्यापकांचे उत्स्फूर्त काव्य वाचन केले. काव्य वाचन(स्वलिखित व इतर कवी) स्पर्धेअंतर्गत राष्ट्रप्रेम, मानवता, राष्ट्रीय एकात्मता,पर्यावरण जाणीव जागृती तर निबंध लेखन स्पर्धेसाठी वाचते व्हा ! , भारतीय खेळाडूंचे कर्तृत्व, भारत माझा देश आहे…, वारी पर्यावरणाची, भारताचे आधुनिक तंत्रज्ञान आणि पोस्टर मेकिंग स्पर्धेसाठी मतदान जाणीव जागृती, लेक वाचवा-लेक शिकवा, एड्स जनजागृती, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक, महाविद्यालय शून्य कचरा व्यवस्थापन, पाणी आडवा-पाणी जिरवा अशा विषयांची निवड करण्यात आली आहे. देश आणि त्याविषयीच्या भौतिक जाणिवा काही अंशी कृत्रिम होत आहेत का ? अशी शंका विविध घटनांमधून विचार करायला भाग पाडतात म्हणून विद्यार्थी देशाप्रती आत्मकेंद्री व्हावा, त्याने देशाप्रती व्यक्त व्हावे यासाठी हे उपक्रम महत्वाची भूमिका बजावतात. असे प्राचार्य डॉ. सुनिल पवार सर यांनी उत्सवाबद्दल मत व्यक्त केले. सांस्कृतिक कला विभाग विद्यापीठाच्या अनुदानापासून कायमच वंचित राहिले आहे, अशा उत्सवांची संकल्पना मांडत असतांना महाविद्यालय आणि संस्थेने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कायमच पाठबळ दिले आहे. सांस्कृतिक कला विभाग हे विद्यार्थ्यांमध्ये कला जाणिवांच्या माध्यमातून सामाजिक आणि वैचारिक आत्मभान जागृत ठेवण्यात अथक परिश्रम घेत असते. अशा उत्सवांच्या माध्यमातून युवा पिढीचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक सबळ होण्यास मदत होते असे सांस्कृतिक समन्वयक प्रा. स्वप्निल रणखांबे उत्सवाची माहिती देताना प्रास्ताविकेत म्हणाले. या उत्सवासाठी कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. निर्मला आडवळे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.संजय गायकवाड, कनिष्ठ विभाग कला मंडळ प्रमुख प्रा. हेमा गोगावले तसेच प्रा.मेघना जोशी,प्रा.अनिकेत काळे, प्रा.अस्मिता गायकवाड,प्रा. सुषमा काळे, प्रा. घोडेकर, प्रा. वाळुंज सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्य हा उत्सव यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. संस्थेचे संस्थापक माननीय आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून रत्नाई महाविद्यालयात कायमच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जाते.संस्थेचे सरचिटणीस प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते आणि खजिनदार माननीय सौ.सुरेखताई दिलीपराव मोहिते पाटील यांनी उत्सवाचे स्वागत केले आहे आणि राष्ट्रचेतना युवा उत्सवासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थीनी प्रियंका धुमाळ हिने केले आणि आभार प्रा.हेमा गोगावले यांनी मानले.