शासकीय योजना जनजागृती लाभ शिबीराला प्रचंड प्रतिसाद,
चाकण : प्रतिनिधी
खेड तालुक्यातील कन्हेसर, गोसासी, सातकर स्थळ व तिन्हेवाडी या गावात शासकीय योजना जनजागृती व विविध योजनांचा लाभ शिबीर उत्साहात संपन्न झाले. या शिबीराला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
हॅन्ड इन हॅन्ड इंडिया तळेगाव दाभाडे आणि कोने एलिवेटर प्रा. लि कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत खेड आणि मावळ तालुक्यातील विविध गावात महिला सक्षमीकरण यावर काम करण्यात येत आहे. त्यातील खेड तालुक्यातील कन्हेसर, गोसासी, सातकर स्थळ व तिन्हेवाडी या ग्रामपंचायती मध्ये शासकीय योजनांची माहिती व विविध शासकीय योजनेचा लाभ पात्र महिला लाभार्थींना मोफत देण्यात आला.
महिला सक्षमीकरण व सबलीकरण महिला बचत गटांना कौशल्य प्रशिक्षण देणे तसेच त्यांना उद्योग निर्मितीसाठी सहाय्य करणे हा प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाची माहिती व त्या योजनेचे फॉर्म भरून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने आयुष्यमान कार्ड, इ – श्रम कार्ड, आधार कार्ड, शॉप ॲक्ट लायसन्स, उद्यम नोंदणी कार्ड इत्यादी त्यांना मोफत काढून देण्यात आले. अनुक्रमे कन्हेसर – २६, गोसासी – ४८, सातकरस्थळ – ४९ व तिन्हेवाडी – ६९ अशा एकूण १९२ महिलांनी याचा लाभ घेतला.
सदर कार्यक्रमासाठी दिशा मल्टी सर्विसेसचे संचालक एकनाथ सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. हॅन्ड इन हॅन्डचे संचालक ओंकार कुलकर्णी, मनीषा गायके, शरद वाडीले, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्य व बचत गटातील महिला यांचे सहकार्य लाभले.