श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त महानगाव निघोजे मध्ये उत्साह
येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे भगवान श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त देशभरात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होतोय. भगवान श्रीरामावर श्रद्धा असलेल्या देशातील तसेच विदेशातील रामभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते श्रीरामाच्या भूमीवर विधिवत अभिषेक होणार आहे. लाखो भाविक या प्रतिष्ठापनेच्या लाभ घेण्यासाठी आयोध्येत दाखल झाले आहेत. अनेकांची इच्छा असूनही ते अयोध्येत होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे जाऊ शकत नाहीत. ज्यांना २२ तारखेला उपस्थित राहणे शक्य नाही ती सर्व भविक मंडळी आपापल्या गावात, शहरात राहून आनंदोत्सव साजरा करत आहे. गेल्या तीन चार दिवसापासून भाविक मंडळी घरोघरी जाऊन या प्रतिष्ठापन सोहळ्याच्या अक्षता वाटप करत आहेत. खेड तालुक्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. खेड तालुक्यातील अनेक गावांत ऐतिहासिक श्री राम मंदिरे आहेत तसेच तालुक्यातील गावागावात प्रमुख रस्ते आणि चौकात झगमगाट निर्माण करण्यात आला आहे.
काही गावात प्रभू श्रीरामाचे भव्य कट आउट उभारून विजेची रोषणाई करण्यात आली आहे. निघोजे गावात यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. मंदिरामध्ये २२ जानेवारीला पहाटे काकडा आरती, महाभिषेक, सकाळी ९ ते १० प्रभू श्रीराम पालखी प्रदक्षिणा, सकाळी १० ते १२ हरी कीर्तन, दुपारी अयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मंदिरात मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. तदनंतर महाप्रसाद, महिला भजन सेवा, हरिपाठ, रात्री उशिरापर्यंत दीपोत्सव व फटाक्यांची आतिषबाजी असे अनेक कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल राहणार असल्याचे माहिती गावातील नागरिक उद्योजक कैलास येळवंडे, सागर येळवंडे, अशोक आल्हाट व ग्रामस्थांनी दिली.