अलंकापुरी ज्ञानभुमी प्रकल्पाचे भुमीपूजन – ध्वजपूजन नितीन गडकरींच्या हस्ते ; ज्ञानेश्वर मंदिरात दर्शन
संतांच्या पालखी महामार्गाची उर्वरित विकास कामे सोहळ्यापूर्वी होणार - गडकरी
आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे उर्वरित विकास कामे येत्या पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे सूचनादेश देण्यात आले असल्याचे वाहतूक, महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगीतले.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी तर्फे विकसित होणाऱ्या वारकरी केंद्रित ज्ञानभूमी या बहुउद्देशीय प्रकल्पाच्या पहिल्या फेज चे भूमिपूजन गडकरी यांचे हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अध्यापक शांतिब्रम्ह मारुती महाराज कु-हेकर होते. ज्ञानभुमी प्रकल्पाचे भुमीपूजन तसेच भव्य भागवत ध्वजपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्साहात झाले. आळंदी श्रीक्षेत्रोपाध्ये ब्रम्हवृंदानी यावेळी वेदमंत्र जयघोष झाला.
भुमीपुजन सोहळ्यास वारकरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ अध्यापक माजी अध्यक्ष शांतिब्रम्ह ह. भ. प. मारुती महाराज कुऱ्हेकर, ह. भ. प. नारायण महाराज जाधव, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार महेश लांडगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ऍड राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, ऍड विकास ढगे पाटील, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने, ज्ञानेश्वर पोंदे , वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त भालचंद्र नलावडे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, केळगांवचे माजी सरपंच दत्तात्रय मुंगसे, विश्वकर्मा सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब मुंगसे पाटील आदी उपस्थित होते.
या प्रसंगी केंद्रीय रस्ते विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री गडकरी म्हणाले, माझे आई – वडिल यांचे बरोबर मी लहान असताना तीर्थक्षेत्र पंढरपूर, आळंदी तसेच देहूला जात होतो. यामुळे मला काम करताना पालखी सोहळ्याचा वारकर्यांचा रस्ता चांगला व्हावा असे वाटत होते. मुंबई महामार्गाचा विकास सोडताना काम करण्यास संधी मिळाली. त्याच प्रमाणे आषाढी वारीला पायी जाणार्या भाविक, वारकर्यांची सोय करण्याचे भाग्य लाभले. पंढरपूर आळंदी, पंढरपुर देहु या दोन्ही पालखी महामार्गाचे विकास कामी प्रगती पथावर आहेत. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे बारामती, इंदापुर, अकलूज या १०२ किलो मिटर मार्ग पुर्ण असून या पुढील काळात अपूर्ण काम येत्या आषाढी पालखी सोहळ्या पूर्वी पुर्ण करण्याच्या सूचना केल्या असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले, पंढरपुर आळंदी पालखी महामार्गावर २२१ किलो मीटर पैकी १७६ किलो मिटरचे काम झाले आहे. येत्या काळात या महामार्गा वरील उर्वरित हडपसर ते दिवे घाट या महामार्गाचे विकास काम आषाढी पालखी सोहळ्या पूर्वी पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. ८२३ कोटी रुपयांचा यासाठी निधी असून या कामाच्या भूमिपूजनास येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त ऍड राजेंद्र उमाप यांनी पालखी मार्ग, आळंदी येथील देवस्थानची काही जागा संरक्षण विभाग वापरात असल्याने ते गट नंबर हे संरक्षण विभागास वापरण्यास बंद करून देवस्थान विकासास मिळावेत यासाठी केंद्रात पाठपुरावा करण्याची मागणी केली. ते म्हणाले, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी मदत करावी. पालखी मार्गाचे उर्वरित कामे मार्गी लावावीत. हरित वारी सोहळा व्हावा यासाठी अहकाऱ्या करण्याचे आवाहन त्यांनी केले. देवस्थानची सुमारे ४५० एकर वर असलेल्या जमिनीवर वन विभाग कडून सामाजिक वनीकरण शेरा असल्याने २० टक्के बांधकाम क्षेत्र मिळणार आहे. ते वाढीव क्षेत्र मिळावे यासाठी पाठपुरावा व्हावा अशी मागणी उमाप यांनी आपले मनोगतातून व्यक्त केली. यावेळी त्यांनी देवस्थानच्या उपक्रमाची माहिती दिली. विश्वस्त निरंजनजी योगी यांनी प्रकल्पाची माहिती देण्यात आली असून यावर विस्तृत चर्चा करून गडकरी यांनी केलेल्या सूचना विचारात घेतल्या जाणार असल्याचे सांगितले. अवधूत गांधी, ज्ञानेश्वर मेश्राम, कार्तिकी गायकवाड यांनी कार्यक्रमात अभंगरचना सादर करून भाविकांची दाद मिळवली. कार्तिकीचे पसायदान गायनाने ज्ञानभूमी प्रकल्पच्या पहिल्या फेजचे भूमिपूजन सोहळ्याची सांगता झाली. तत्पूर्वी गडकरी यांनी माउली मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान तर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील यांनी पुणे आळंदी रस्ता ६० मीटर व्हावा यासाठी मागणीचे निवेदन त्यांनी दिल्याचे सांगितले. व्यापारी तरुण मंडळाचे वतीने माऊली ग्रुप तर्फे अध्यक्ष माऊली गुळुंजकर यांनी स्वागत केले. यावेळी देवस्थान तर्फे विकसित होणाऱ्या प्रकल्पावर आधारित ध्वनीचित्र फितचे सादरीकरण करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात मारुती महाराज कुरेकर यांनी प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा असे सांगत प्रकल्पाचे भूमिपूजन निमित्त आशीर्वाद दिले. सूत्रसंचालन विश्वस्त भावार्थ देखणे यांनी केले. प्रास्ताविक विश्वस्त ऍड राजेंद्र उमाप यांनी केले. आभार विश्वस्त ऍड विकास ढगें पाटील यांनी मानले.