पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी)
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2023/12/IMG-20231212-WA0026-1024x576.jpg)
तळवडे चौकात शनिवारी (दि. ९) दुपारी दोन वाजता वृषाली बाजीराव भालेकर यांचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना वाहतूक विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे घडली आहे. त्यामुळे तळवडे ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे. पोलीस आयुक्तांनी तळवडेतील वाहतूक समस्या १५ दिवसांत न सोडविल्यास तळवडे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
तळवडे ग्रामस्थांच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, भालेकर यांचा अपघात घडला त्या दिवशी आळंदी यात्रा होती. त्या वेळी तळवडे चौकात एकही वाहतूक नियंत्रक पोलीस उपस्थित नव्हता. या घटनेनंतर देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल गजेवार आले. त्यांनी संबंधित मयताचे नातेवाईक व ग्रामस्थ महिलांना धमकावले. तसेच तुमच्यावर गुन्हे दाखल करू व करिअर बर्बाद करू आणि उपस्थित महिलांसोबत असभ्य भाषेत वर्तन केले. या घटनेच्या निषेधार्थ संबंधित पोलीस कॉन्स्टेबल गजेवार यांची त्वरित बदली करावी. तसेच वाहतूक विभागाचे कर्मचारी व अधिकारी कोणीही हजर नव्हते त्यांच्यावर कारवाई करावी.
तळवडे कॅनबे चौक ते त्रिवेणीनगर या रोडवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या मार्गावर सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालावी. अन्यथा तळवडे हद्दीतील चाकण एमआयडीसीला जाणारा ब्रिज बंद करण्यात येईल. निगडी तळवडे मार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा. तळवडे चौक, त्रिवेणीनगर चौक येथे नियमित वाहतूक नियमन करणारे पोलीस नियुक्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पोलीस आयुक्तांना निवेदन देताना माजी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सोनवणे, शरद भालेकर, विनायक पिंजण, अनिल भालेकर, तुकाराम भालेकर, प्रवीण पिंजण, शरद गोपाळ भालेकर, अशोक भालेकर, रमेश बाठे, बाजीराव भालेकर, दीपक बोर्डे, भरत कामठे, बाळासाहेब नखाते उपस्थित होते.