चाकणमधील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण,. उपाययोजना करण्याची मागणी,.
चाकण : प्रतिनिधी
येथील पुणे – नाशिक महामार्ग, चाकण – तळेगाव, चाकण – शिक्रापूर या मार्गावर दिवसभर सातत्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महामार्गावर तसेच वर्दळीच्या ठिकाणी अगदी दोन किलोमीटर वाहनाच्या लांब रांगा लागत आहेत. या वाहतूक कोंडीला विद्यार्थी, कामगार, उद्योजक व प्रवासी सारेच वैतागले आहेत.
वाहतूक कोंडी कोण सोडवणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. नेत्यांच्या कामांच्या घोषणा झाल्या आणि आश्वासने झाली. परंतु प्रत्यक्षात काहीच काम होत नाही. निवडणुका आल्या आणि गेल्या. परंतु चाकणकर नागरिक वाहतूक कोंडीत अडकले आहेत. वाहतूक कोंडीत दररोज चाकणकर नागरिक, उद्योजक, कामगार, विद्यार्थी व शेतकरी भरडला जात आहे. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याने रुग्णांना उपचारात प्रचंड अडथळे येत आहेत. या मार्गाने ये – जा करणा-या राज्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे. परंतु वाहतूक कोंडी काही केल्या सुटत नाही.
गुगल मॅपवर चाकण येथे किती वाहतूक कोंडी आहे, हे पाहिले की वाहतूक कोंडी मोठी दिसते. त्यामुळे आता चाकण मधील प्रवास नकोसा वाटत असे अनेकांचे म्हणणे आहे. या रस्त्यांनी प्रवास करणे कंटाळवाणे झाले आहे. वाहतूक कोंडीचा फटका चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगार व कंपन्यांना बसत आहे. चाकण – शिक्रापूर परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या असून येथे औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे या भागात सातत्याने वाहनांची ये – जा मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्याचबरोबर कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नाही, तर येथील उद्योग वसाहतींना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील कंपन्या उद्योग दुसरीकडे स्थलांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
” चाकण मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. पुणे – नाशिक महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. मात्र रस्त्यालगत असलेले विद्युत खांब व रोहित्र यामुळे विस्तारीकरणाला अडथळा निर्माण होत आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरच या भागातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे पुणे – नाशिक महामार्गाचे विस्तारीकरण लवकरात लवकर करण्याची गरज आहे.” – दीपक ताटे, अध्यक्ष, भापसे पार्टी,.
” पुणे – नाशिक महामार्गावरील चाकण येथील तळेगाव चौक व आंबेठाण चौक या दोन्ही ठिकाणी बांधण्यात आलेले उड्डाणपूल चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आले आहेत. हे दोन्ही पूल असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही चौकांमध्ये उंचावरील स्काय वाक ( पादचारी फुल ) उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.” – बाळासाहेब उर्फ ज्ञानेश्वर शिळवणे, उद्योजक, चाकण.