चाकण एसटी बसस्थानका लगतच्या
कच-यामुळे प्रवाशी त्रस्त,.
चाकण : प्रतिनिधी
येथील एसटी बसस्थानकालगत राहणारे भाडेकरू, व्यावसायिक व फळविक्रेते रात्री अपरात्री स्थानकाच्या बाजूला कचरा फेकत असल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे. वाढत्या कच-यामुळे प्रवाशी त्रस्त झाले असून, या कच-याची नियमित विल्हेवाट लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
कच-या बरोबरच अनधिकृत वाहनांचे अधिकृत वाहनतळ येथे बनत चालले आहे. या स्थानकाच्या आवारातील व्यवसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमुळे बसस्थानकाच्या आवारात खाजगी वाहनांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाकण एसटी बस स्थानकात पुण्याहून येणाऱ्या बस येत नाहीत. चाकण येथील हे बसस्थानक वाहनतळ आहे, की, एसटी बसस्थानक अशी शंका येवू लागली आहे. चाकण बसस्थानकाचे काही वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले. हे नुतनीकरण बांधा, वापरा, हस्तांतर करा, या तत्वावर झाले असल्याने बस स्थानकाच्या आवारात अनेक व्यापारी गाळे बांधण्यात आले असून, त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची वाहने बसस्थानकाच्या आवारातच अस्ताव्यस्त कशाही पद्धतीने उभी केली जातात. त्यामध्ये कच-याच्या दुर्गंधीची भर पडू लागली आहे.
चाकण एसटी बसस्थानकात पायाभूत सुविधांची वाणवा असून, स्थानका लगतच्या परिसरात स्वच्छता राखली जात नाही. तसेच चाकण परिसरातून मोठ्या प्रमाणात खासगी वाहनधारकांकडून चाकण – शिक्रापूर व इतर रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. स्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक केली जात असून, स्थानक परिसराच्या दोनशे मीटर परिसरात नो पार्किंग झोन असला तरी त्याचे उल्लंघन चोरटी वाहतूक करणारांकडून सर्रासपणे केला जात आहे.
” चाकण एसटी बस स्थानकालगतच्या मोकळ्या जागेत कचरा फेकणे चुकीचे आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधी सुटून इतरांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हॉटेल चालक व भाजीपाला विक्रेत्यांनी भाज्यांचा उर्वरित पाला इतरत्र फेकून देण्याचे टाळावे. चाकण नगर परिषदेला सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित असून याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची जबाबदारी नागरिकांनी व प्रशासनाने घेतली पाहिजे.'” – पूजा कड – चांदेरे, माजी नगराध्यक्षा, चाकण नगरपरिषद.