चाकणला कर्जत – जामखेड भागातून पंचगंगा जातीच्या नवीन कांद्याची आवक सुरू,. शेतकरी व व्यापारी होणार मालामाल,.
चाकण : प्रतिनिधी
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डच्या उपबाजारात नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. खेड तालुक्याच्या विविध भागातून व कर्जत – जामखेड या भागातूनही पंचगंगा जातीच्या नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे.
यंदाच्या हंगामात प्रथमच नवीन कांद्याची ७ हजार पिशवी एवढी मोठी आवक झाली आहे. नवीन कांद्याला २,००० ते ४,२०० रुपये असा भाव प्रतिक्विंटला मिळत असून जुन्या कांद्याला प्रतवारीनुसार चार ते सहा हजार रुपये दर प्रति क्विंटला मिळत आहे. खराब हवामान, अवकाळी पाऊस यामुळे काही प्रमाणात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असले तरी पुढील महिन्यात कांद्याची आवक वाढण्याची दाट शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. चाकण बाजारात शनिवारी नवीन कांद्याची तब्बल ७,००० पिशवी म्हणजेच ३,५०० क्विंटल कांद्याची आवक होऊन २ हजार ते ४ हजार २०० रुपये एवढा प्रतिक्विंटला भाव मिळाला असल्याचे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांतीताई सोमवंशी व सचिव बाळासाहेब धंदरे यांनी सांगितले.
घाऊक बाजारात आता खंडाळा, बावडा व पंचगंगा जातीच्या नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. निर्यातक्षम नवीन हळवा गावरान कांदा पुढील महिन्यात बाजारपेठेत दाखल होणार असल्याचे शेतकरी व्यापारी आवर्जून सांगत आहेत. मात्र, नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मागील महिनाभरापासून सर्वत्रच कांद्याचे भाव वाढलेले होते. राज्यभरात कांद्याला असणारी मागणी लक्षात घेता कांद्याचा पुरवठा कमी होता. त्यामुळे कांद्याचा अचानक भाव वाढला होता. परंतु आता नवीन कांद्याची आवक काही प्रमाणात सुरू झाली आहे. पुढील काळात ही आवक आणखी वाढल्यास कांद्याच्या दरात घसरण होणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत कांद्याचा पुरवठा कमी राहणार असल्याने तोपर्यंत कांद्याचे दर अधिकच राहतील. नवीन कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यानंतर दरात मोठी घसरण होणार असल्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.
” चाकण बाजारात लगतच्या जिल्ह्यातील नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. वखारीत साठवलेला कांदा संपला असल्याने बाजारात विक्रीसाठी येत नाही. कांद्याची मागणी वाढत असल्याने आवक असूनही भाव तेजीत राहत आहेत. पुढील एक – दोन महिन्यात कांद्याची आवक वाढून बाजारभाव नियंत्रणात येतील. शेतकरी व व्यापारी हे सुद्धा मालामाल होतील.” – संभाजी कलवडे, कांदा व बटाट्याचे प्रसिद्ध व्यापारी, चाकण.
” कांद्याला तामिळनाडू, आंध्रप्रदेश व केरळ या राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने येथील मार्केट मधून कांदा दक्षिण भारतात जात आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचा दर पुढील काही महिन्यात तेजीत राहण्याची दाट शक्यता आहे.” – रवींद्र बोराटे, व्यापारी, चाकण.
” बांगलादेशाने कांद्यावरील आयात शुल्क हटविल्याने पुढील काही काळात कांदा उत्पादकांना अधिक भाव मिळेल, असे चित्र निर्माण झाले आहे. देशातून कांदा निर्यात श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई या आखाती देशात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढतील, याचा सर्वाधिक फायदा शेतकरी, व्यापारी व कांदा निर्यातदार कंपन्यांना होणार आहे.” – दीपक ताटे, अध्यक्ष, भापसे पार्टी,