खेड तालुक्यात क्रेनच्या स्वागत हारांना प्रचंड मागणी,.
गुलाल उधळण्याचा ट्रेंड आता बदलतोय
चाकण : प्रतिनिधी
खेड – आळंदी विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या वेगात सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू असल्याने या निवडणुकीत क्रेनच्या स्वागत हारांना तसेच छोटे हार, बुके यांना प्रचंड मागणी वाढली आहे. दिवसेंदिवस निवडणुकीत गुलाल उधळण्याचा ट्रेंड आता बदलू लागला आहे.
उमेदवारांच्या प्रचारा निमित्त उमेदवारांचे जंगी स्वागत क्रेनच्या स्वागत हारांनी केले जात आहे. हे स्वागत हार अगदी २००, ४०० किलो व काही अधिक किलो वजनाचे आहेत. या हारांसाठी झेंडू, गोंडा, गुलाब व इतर फुले पाने यांचा वापर केला जात आहे. या हारांना मोठी मागणी असल्याचे फुल विक्रेत्याकडून सांगितले जात आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी निवडणुकीत गुलाल उधळण्याचा ट्रेंड होता. बदलत्या काळानुसार फुलांचे स्वागत हारतुरे बुके यांची मागणी वाढली. त्यामुळे जिल्ह्यात, राज्यात फुलशेतीला प्रचंड महत्व आले आहे. निवडणुकीत फुलांच्या विविध प्रकारच्या हारांची मोठी मागणी वाढली आहे. निवडणूक उत्सव, जत्रा प्रचार रॅली, मिरवणूक राजकीय नेत्यांची सभा यामध्ये सध्या क्रेनचा वापर करत फुलांचा मोठा हार क्रेनला अडकवला जातो. साधारणपणे २५ ते ३० फूट उंचीचा स्वागत हार असतो. जेसीबी क्रेन मशीनला अडकून तयार केलेला उंच स्वागत हार हा नेत्यांच्या स्वागताचे आकर्षण ठरत आहे. निवडणुकीच्या प्रचारात तसेच निवडणुकीनंतरच्या मिरवणुकीत जेसीबीच्या लोखंडी हौद्यामध्ये तसेच बकेटमध्ये फुलांच्या पाकळ्या भरून त्या नेत्यावर अथवा उमेदवारावर उधळण्यात येत आहेत.
जेसीबी मधून उधळण्यासाठी फुलांचे हार सध्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. यासाठी गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे फुलांना मोठी मागणी आहे. किलोला अगदी १०० – २०० रुपयांचा भाव फुलांना आहे. स्वागत हारांच्या किमती हजार रुपयात आहेत. काही उमेदवार हा खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट करतात तर काही उमेदवार हा खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट करत नाहीत. क्रेनला अडकवलेले मोठे उंच स्वागत हार हे हजारो रुपयांच्या किमतीचे आहेत.
राजकीय नेता अथवा उमेदवार यांच्या गळ्यात क्रेनच्या साह्याने महागडा हार घालने ही पद्धत चुकीची वाटते. यावर होणारा अनाठाई खर्च वाचवण्याची गरज आहे. अनाथ अथवा वंचितांच्या शिक्षणासाठी या खर्चाचा उपयोग होणे अपेक्षित वाटते. त्यातून निश्चितपणे समाजात प्रबोधन होईल.”- दीपक ताटे, पक्षप्रमुख, भापसे पार्टी,.