नवरात्र उत्सवामुळे कर्नाटकहून रताळ्यांची उच्चांकी आवक,.
प्रति एका किलोस ४५ रुपये भाव,.
चाकण : प्रतिनिधी
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शारदीय नवरात्र उत्सवामुळे कर्नाटकहून रताळ्यांची तब्बल ५५ टन इतकी उच्चांकी आवक झाली. नवरात्रामुळे चाकण बाजारात रताळ्यांना मोठी मागणी असूनही भाव तेजीत आहेत.
चाकण मार्केट मध्ये सोमवार वगळता फळभाज्या व पालेभाज्यांचा मोठा बाजार भरतो. या बाजारात पुणे जिल्ह्यातील व्यापारी व खरेदीदार भाजी खरेदी व विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात. घटस्थापना व नवरात्रामुळे मात्र रताळ्यांची भरपूर आवक झाली. ही रताळी खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. वजनाने जड असलेल्या या रताळ्यांची भरपूर आवक होवूनही त्यांचे भाव कडाडले आहेत. रताळे खरेदीसाठी चाकण मार्केट मध्ये सकाळपासूनच ग्राहकांची वर्दळ सुरु असल्याचे व्यापारी रविंद्र बोराटे, सचिन चकवे, अमीर खान व राज कुमार आदींनी सांगितले. एका किलोसाठी ४५ ते ५० रुपये असा भाव होता. दरम्यान, चाकण मार्केटमध्ये कारली, भोपळा, कोबी, फ्लॉवर, वांगी, भेंडी, गाजर, दोडका आदींनाही मोठी मागणी होती. तर कांदा व बटाटा यांचे भाव गडगडत असल्याने शेतकरी व व्यापारी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक व दिल्ली या राज्यातून मोठ्या प्रमाणावर फळभाज्यांची आवक होत आहे. भाज्यांची आवक वाढूनही भाव चांगलेच कडाडले आहेत. किरकोळ व घाऊक बाजारात रताळे विक्रेत्यांनी बऱ्यापैकी नफा कमविला. मात्र, याचा तोटा ठोक व्यापाऱ्यांना बसला असल्याचे सचिन चकवे व रवींद्र बोराटे यांनी सांगितले.