महाळुंगे (खेड) :
महाळुंगे येथिल ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ५ जून २०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता निसर्गराजा मित्र जीवांचे यांच्या माध्यमातून आणि टॉमटॉम इंडिया प्रा.ली यांच्या सहकार्याने बोटॅनिकल गार्डनचे उद्घाटन जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संपन्न झाले. थ्री पिरॅमिड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश शिवळे पाटील, सचिव योगेश रोकडे, संचालक रोहिदास रोकडे. टॉमटॉम इंडिया प्रा.ली चे साईट हेड दया ओगले व निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेचे अध्यक्ष अतुल वाघ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
दुर्मिळ होत चाललेल्या स्थानिक वनस्पतीची माहिती व्हावी या उद्देशाने या गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे. यात विविध वेली, औषधी वनस्पती, नक्षत्र राशी यांच्या आराध्य वनस्पती तसेच पक्षी, मधमाश्या , फुलपाखरे यांच्या आवडीच्या वनस्पती यांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय परिसरात इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यानी १२० प्रजातीच्या ३०० दुर्मिळ रोपांची लागवड केली असून विद्यार्थ्यांना प्रत्येक झाडाचे महत्व निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेच्या सहकार्यांनी समजावून सांगितले तसेच विद्यार्थ्याचे गट तयार करून त्यांना ठरविक झाडांची निगा राखण्याबाबत समजावून सांगितले जेणे करून त्यांना जीवनात पर्यावरणाचे महत्व प्राप्त होईल. तसेच आजच्या पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून निसर्गराजा मित्र जीवांचे आणि स्केल अँड टेल यांच्या संयुक्त विद्यमाने वन्य जीव परिचय हा उपक्रम सुरू करण्यात आला, ज्यात रोज एका वन्य जीवाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवली जाईल. थ्री पिरॅमिड एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश रोकडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
तसेच नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यानी ग्रीन डे साजरा करून पर्यावरण जागृतीच्या घोषणा देत रॅली काढली.
या कार्याक्रमाचे आयोजन ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका वंदना रोकडे, सांस्कृतिक विभाग आणि निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेचे अध्यक्ष अतुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या स्वयं सेवकांनी केले.