उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद
बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्यांशी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट दिली. यावेळी मातोश्री येथे ठाकरे कुटुंबीय, ठाकरे गटाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे तथा आदित्य व तेजस ठाकरे या दोन्ही मुलांसह पादुका पूजन करून अविमुक्तेश्वरानंद यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर शंकराचार्यांनी त्यांच्याशी संवादही साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंबरोबर मोठा विश्वासघात झाला असल्याचं सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, ठाकरे कुटुंबीयांच्या विनंतीनुसार मी येथे आलो. त्यांनी माझं स्वागत केलं. आम्ही सर्वजण हिंदू धर्म व सनातन धर्म पालन करणारे आहोत. आपल्याकडे पाप-पुण्याची भावना सांगण्यात आली आहे. गो हत्या हे सर्वात मोठे पाप आहे. पण त्याहून मोठा घात हा विश्वासघात आहे. हाच घात उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाला आहे. ही वेदना अनेकांच्या मनात आहे. ही वेदना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईपर्यंत दूर होणार नाही, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यावेळी बोलताना म्हणाले.
अविमुक्तेश्वरानंद यांनी यावेळी आमचेच हिंदुत्त्व खरे या एकनाथ शिंदे व भाजपच्या दाव्याचाही चांगलाच समाचार घेतला. अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, कुणाचे हिंदुत्व अस्सल आहे आणि कुणाचे नकली हे जाणून घ्यावे लागेल. जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदूच असणार. ज्या लोकांनी विश्वासघात केला ते हिंदू असू शकत नाहीत.
अविमुक्तेश्वरानंद पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंबरोबर विश्वासघात झाला. महाराष्ट्रातील समस्त जनतेला ही वेदना ठावूक आहे. लोकसभा निवडणुकीतही ही गोष्ट सिद्ध झाली आहे. ज्यांनी विश्वासघात केला, त्यांनी जनतेच्या मताचाही अनादर केला होता. सरकारला मध्येच फोडायचे आणि जनतेच्या मताचा अनादर करणे, हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
जानेवारीमध्ये अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. मात्र ही प्राणप्रतिष्ठा शास्त्रानुसार होत नसल्याचा दावा करत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यासह अन्य काही शंकराचार्यांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे जोरदार समर्थन केले होते.