डॉ. राजेंद्र रसाळ यांचा आदर्श घ्या – रामदास धनवटे
सत्यविचार न्युज :
शैक्षणिक संकुलामुळे चाकण पंचक्रोशीतील हजारो युवक – युवतींना पदवीपर्यंतचे शिक्षण अविरतपणे मिळत आहे. याचा सर्व विश्वस्तांना सार्थ अभिमान आहे. त्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान देणारे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र रसाळ यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा, असे विचार राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक रामदास धनवटे यांनी येथे व्यक्त केले.
चाकण शिक्षण मंडळाच्या येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख व आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते डॉ. रसाळ यांचा सेवानिवृत्ती निमित्त चाकण महाविद्यालयात सन्मान करण्यात आला. त्यावेळी धनवटे बोलत होते. चाकण शिक्षण मंडळाचे कार्यकारी विश्वस्त मोतीलाल सांकला हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी चाकण शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अविनाश अरगडे, विश्वस्त संतोष सांकला, डॉ. असित अरगडे, डॉ. शिवाजी एंडाईत, वैशाली सांकला – ओसवाल, प्राचार्य डॉ. राजेश लाटणे, डॉ. दत्तात्रय तांबे, योगिता गवळी, प्रा. विकास देशमुख, प्रा. हनुमंत मराठे, उद्योजक विष्णू कड, राजू गायकवाड, ज्ञानेश्वर घाटे, बाळासाहेब शिळवणे आदींसह चाकण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र रसाळ यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव करून धनवटे म्हणाले,” गुणवत्तापूर्ण अध्यापनाचे काम करत डॉ. रसाळ यांनी चाकण महाविद्यालयाच्या नॅक मुल्यांकनाच्या कामाला उत्तम सहकार्य केले आहे. महाविद्यालयाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणारे डॉ. रसाळ यांचे विकास कार्यात बहुमोलाचे सहकार्य होते. विद्यार्थ्यांच्या अडी – अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.”
प्रा. विकास देशमुख यांनी प्रास्ताविक केले. डॉ. उमेश भोकसे यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. शिवाजी एंडाईत यांनी आभार मानले.