चाकणला शुक्रवार पासुन शेठ धनराजजी
सांकला स्मृती व्याख्यानमाला,.
सत्यविचार न्यूज :
चाकण रोटरी क्लबच्या वतीने चाकण येथे शुक्रवार ( दि. ५ एप्रिल ) ते मंगळवार ( दि. ९ एप्रिल ) या सलग पाच दिवसांच्या नियोजित कालावधीत कै. शेठ धनराजजी सांकला स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. पाच दिवस चालणारी ही व्याख्यानमाला यंदा चांगलीच गाजणार असल्याची माहिती चाकण रोटरी क्लबचे अध्यक्ष अतुल वाव्हळ, सचिव डॉ. अमोल बेनके व व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रज्ञा भवारी यांनी दिली.
चाकण पोलीस ठाण्यासमोरील रोटरी क्लबच्या प्रांगणात वरील नियोजित कालावधीत सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळात ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. गेल्या चौतीस वर्षापासून ही व्याख्यानमाला अखंडितपणे सुरु असून, यंदा या व्याख्यानमालेचे पसतीसावे वर्षे आहे.
शुक्रवारी ( दि. ५ एप्रिल ) सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध व्याख्यात्या अनघा मोडक यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर मोडक ह्या ” जगण्याचे गाणे होताना ” या विषयवार व्याख्यान मालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. खेडचे आमदार दिलीप मोहिते व रोटरी ३१३१ च्या जिल्हा प्रांतपाल मंजू फडके हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी ( दि. ६ एप्रिल ) प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी हे ” दिलखुलास मैफिल गप्पांची ” या विषयवार दुसरे, तर
रविवारी ( दि. ७ एप्रिल ) माजी सरपंच भास्करराव पेरे – पाटील हे ” ग्रामविकास काळाची गरज ” या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत.
सोमवारी ( दि. ८ एप्रिल ) प्रसिद्ध नाट्य अभिनेते चारुदत्त आफळे हे ” देशप्रेम व आजचा युवक ” या विषयवार चौथे पुष्प गुंफतील.
मंगळवारी ( दि. ९ एप्रिल ) डबिंगचे संचालक पंकज रैना हे ” माझे सिनेमा सृष्टीतील विविध अनुभव ” या विषयावर मार्गदर्शन करून अखेरचे पुष्प गुंफणार आहेत.
रोटरीचे माजी प्रांतपाल मोहन पालेशा हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
समाजात राहून आदर्श घेण्यासारखे चांगले काम केलेल्या व्यक्तीला यावेळी चाकण रोटरी क्लबच्या वतीने ” आदर्श कार्यकर्ता पुरस्कार ” देवून गौरविण्यात येणार असल्याची माहिती चाकण रोटरी क्लबचे अध्यक्ष अतुल वाव्हळ, सचिव डॉ. अमोल बेनके, व्याख्यानमाला समितीच्या चेअरमन डॉ. प्रज्ञा भवारी, डॉ. वैशाली परदेशी व सुवर्णा गोरे यांनी दिली.
” चाकण शिक्षण मंडळाचे सचिव व चाकण रोटरी क्लबचे संस्थापक – माजी अध्यक्ष मोतीलाल सांकला यांचे वडील कै. शेठ धनराजजी सांकला यांनी त्यांच्या हयातीत अनेक लोकोपयोगी कामे करून आपल्या कार्यकर्तुत्वाने समाजात वेगळा ठसा उमटविला होता. त्यामुळे त्यांच्या कष्टाचे चिज व्हावे, त्यांच्या आठवणी चिरंतन काळ टिकून राहाव्यात, आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा, या हेतूने गेल्या चौतीस वर्षापासून चाकण रोटरी क्लबच्या माध्यमातून या व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे. ” – डॉ. अमोल बेनके, सचिव, चाकण रोटरी क्लब