शालेय प्रश्न मंजुषा स्पर्धेत मुलींचा संघ प्रथम
सत्यविचार न्युज :
खडकी (पिंपळगाव) येथील काळ भैरवनाथ सौ. लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालयात आयोजित शालेय प्रश्न मंजुषा स्पर्धेत मुलींचा संघ प्रथम आल्याची माहिती मुख्याध्यापक सुनिल वळसे यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मंचर (ता. आंबेगाव) येथील डॉ. मुमताज अहमद खान शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बी. एड. प्रशिक्षणार्थिंचा छात्र सेवाकाल गट यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचेही सुनिल वळसे यांनी सांगितले.
या प्रश्न मंजुषा स्पर्धेत शाळेतील एकूण सहा संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी वैज्ञानिक, गणितीय, ऐतिहासिक, भौगोलिक, सामान्य ज्ञान तसेच व्याकरणावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेत सहभागी संघांनी विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धेसाठी विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली. या नियमावली नुसार प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊन सहभागी संघांना प्रश्न विचारण्यात आले. त्यानुसार विजेत्या गटाची निवड करण्यात आली.
प्रश्न मंजुषा स्पर्धेतील विजयी संघात समिक्षा भगत, कशिश ईनामदार, युक्ती वाबळे, गौरी भोर व तेजल शेंगाळ या विद्यार्थिनी सहभागी होत्या.
प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन व नियोजन श्वेता धुमाळ, निकिता काळे, सोनाली ढोबळे, प्रतिक्षा सोनवणे, रेश्मा बिबवे, सरिता शिंदे, कनिज ईनामदार, गीतांजली पिंगळे, निलम लोहकरे, मनिषा लामखडे व अमित फलके या बी. एड. प्रशिक्षणार्थिंनी केले. या प्रशिक्षणार्थिंना मुख्याध्यापक सुनिल वळसे आणि गट प्रमुख प्रा. अनंत बोरकर यांनी मार्गदर्शन केले. शाळेत प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल खडकी (पिंपळगाव) येथील ग्रामस्थांनी बी. एड. प्रशिक्षणार्थिंचे कौतुक केले आहे.