सत्यविचार न्युज :-
मागील काही दिवसांपासून सेतू सुविधा केंद्रांतील सर्व्हर डाऊन आहे. परिणामी इथे विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी नागरिकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. बऱ्याच कालावधीपासून तांत्रिक समस्या येत असतानाही यंत्रणेत अद्याप सुधारणा न झाल्याने नागरिकांकडून प्रचंड रोष व्यक्त होत आहे.
सध्या शैक्षणिक कामासाठी शाळा-कॉलेजांच्या तसेच प्रवेशाची लगबग सुरू असतानाच झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे खेड तालुक्यासह जिल्हाभर गोंधळाची स्थिती आहे.
सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून एका छताखाली सर्व सुविधा नागरिकांना मिळतात. डोमिसाईल प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आदी सेवा या केंद्रांद्वारे दिल्या जातात. या सेवा केंद्रांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात. नेहमी या केंद्रावर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतात. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून खेड तालुक्यासह जिल्हाभरातील सेतू सुविधा केंद्रात सर्व्हर डाऊन असल्याने कर्मचाऱ्यांबरोबरच या केंद्रात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने प्रमाणपत्र किंवा दाखला देण्यात अडचणी येत आहेत. एक प्रमाणपत्र किंवा दाखला घेण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने लांबच लांब रागा लागत आहेत. परिणामी या केंद्रांवर गोंधळाचे वातावरण आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांची गैरसोय होत असताना, सुविधा केंद्रांतील अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
आर टी इ व सध्या शाळा-कॉलेजांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. कॉलेजच्या प्रवेशासाठी अधिवास प्रमाणपत्र, इतर दाखले लागतात. सेतू केंद्रातील तांत्रिक समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना हे दाखले मिळवताना मनस्ताप होत आहे.