पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तडीपार गुन्हेगारास अटक, चार घरफोडी केल्याचे उघड; चिंचवड पोलिसांची कामगिरी
सत्यविचार न्युज :
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. त्याच्या आणखी दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी घरफोडीचे चार गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्याकडून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. चिंचवड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली. सुनील मारुती लोणी (२२, रा. बिजलीनगर, चिंचवड), प्रथमेश मुकुंद मोदी (२२, रा. रूपीनगर, तळवडे), सौरभ दत्तात्रय शिंदे (२३, रा.चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तडीपार केलेला सुनील लोणी हा हत्यार घेऊन चिंचवड येथे आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, चिंचवड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने नागसेननगर झोपडपट्टी रेल्वे पटरीजवळील पुलाखाली सापळा लावला. त्यावेळी सुनील हा तेथे थांबलेला दिसला. पोलिसांची चाहूल लागताच, तो रेल्वे पटरीच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांनी त्याला पकडले.
आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे पिस्तूल, काडतुसे व पाच हजार रुपये असा एकूण ४७ हजारांचा मुद्देमाल मिळाला. त्याने त्याचे साथीदार प्रथमेश आणि सौरभ यांच्यासोबत घरफोडी केल्याचे कबूल केले. त्यानुसार, प्रथमेश आणि सौरभ यांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक आर.जे. व्हरकाटे, पोलीस उप निरीक्षक ए.बी.दुधे, पोलीस अंमलदार सहा. पोलीस फौजदार पांडुरंग जगताप, पोलीस हवालदार धर्मनाथ तोडकर, संतोष गायकवाड, भाग्यश्री जमदाडे, पोलीस शिपाई रोहीत पिंजरकर, उमेश मोहीते, रहीम शेख, पकंज भदाणे, गोविंद डोके, अमोल माने, जितेंद्र उगले, उमेश वानखडे, यांनी मिळून केली आहे.