इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्याचे आळंदीतून रविवारी प्रस्थान
पायी परिक्रमा हरिनाम गजरात मार्गस्थ होणार
इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीस परिक्रमेत समाज प्रबोधन
आळंदी / प्रतिनिधी : नामा म्हणे प्रदक्षिणा ! त्याच्या पुण्या नाही गणना !! इंद्र तपश्चर्या ठिकाण व आळंदी येथील इंद्रायणी नदी दक्षिण तटावरून उगमस्थान श्रीक्षेत्र कुरवंडे ते श्रीक्षेत्र तुळापूर ते आळंदी या मार्गावरून इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा प्रथमच होत आहे. या अंतर्गत भाविक पायी दिंडी परिक्रमा हरीनाम गजरात करणार आहेत. या उपक्रमातून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीस इंद्रायणी नदीचे दुतर्फा मुक्कामाचे ठिकाणी कीर्तन सेवेचे माध्यमातून समाज प्रबोधन केले जाणार आहे. या पालखी सोहळ्याचे आयोजन १७ ते २८ डिसेम्बर २०२३ या कालावधी होत आहे. आळंदीतून या परिक्रमा पालखी सोहळ्याचे प्रस्थान रविवार ( दि. १७ ) हरिनाम गजरात सकाळी आठ वाजता होणार असल्याचे परिक्रमेचे मुख्य संयोजक ह. भ. प. गजानन महाराज लाहुडकर यांनी सांगितले.
सोहळ्यात निवृत्ती महाराज संस्थान अध्यक्ष निलेश गाढवे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे विश्वस्त योगी निरंजननाथजी, संत सोपानदेव मंदिर संस्थान अध्यक्ष त्रिगुण महाराज गोसावी, श्री संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील, श्री संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार महेशदादा लांडगे, आमदार सुनील अण्णा शेळके यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
इंद्रायणी स्नान करिती प्रदक्षिणा | तुटती यातना सकळ त्यांच्या ||
वाचे वदंता इंद्रायणी | यम वंदितो चरणी ||
इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यात पालखीत श्रींचे पादुका, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी, श्री संत तुकाराम महाराज गाथा विराजित असतील. पालखी सोहळ्यात ठिकठिकाणचे गावात मुक्कामाचे ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, स्वच्छता जनजागृती, अजाणवृक्षाचे रोपण आदी कार्यक्रम होत आहेत. पायी दिंडी या परिक्रमेत भाविक, वारकरी, अनेक गावांतील ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. परिक्रमेत इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यास उपाय योजना, जनजागृती होणार आहे. तसेच या परिक्रमेस अध्यात्मिक दृष्टीने ही महत्त्व आहे. या संदर्भात संतांचे साहित्यात विशेष उल्लेख देखील आहेत.
इंद्र येऊनिया भुमिसी ! याग संपादिले अहर्निशी !!
इंद्रायणी इंदोरीशी ! पंचक्रोशी या पासोनि !!
तसेच नवनाथ भक्तिसार या ग्रंथात देखील या बाबत विश्लेषण आहे.
ते मणिकर्णिकेचे जीवन ! आणिले होते कमंडलू भरोन !
परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन ! इंद्रायणी पडियेले !!
असे इंद्रायणी नदीचे प्राचीन काळापासून महत्त्व असून या इंद्रायणी नदीचे तीरावर श्रीक्षेत्र कुरवंडे, श्रीक्षेत्र देहू, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र तुळापूर यासह अनेक गावे, वाड्या, वस्त्या असून परिसराचे जीवन फुलविले आहे. दरवर्षी इंद्रायणी नदी काठी लाखो भाविकांचे उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा, श्रींचे पालखी प्रस्थान आषाढी व कार्तिकी वारी आदी धार्मिक कार्यक्रम प्रसंगी भाविक इंद्रायणी स्नान व देवदर्शनास येतात. यासाठी परिक्रम महत्त्वाची आहे. यासाठी इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व नदीचे पावित्र्य जतन करणे गरजेचे आहे. यासाठी इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा अंतर्गत पायी दिंडी परिक्रमा समाज प्रबोधन उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे व्यवस्थापक अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. पालखी सोहळ्या निमित्त कार्यक्रम पत्रिका अनावरण मारुती महाराज कुरेकर यांचे कृपाशीर्वादाने रवींद्र पाटील, विनायक हरणे पाटील, रवींद्र महाराज हरणे, विशाल महाराज खोले, पंकज महाराज पाटील, संदीप महाराज मोतेकर आदी उपस्थित होते. इंद्रायणी माता नदी दुतर्फ़ा परिसर उत्तर व दक्षिण तट, उगम ते संगम या भागात ग्रामस्थ, नागरिक, वारकरी यांचे शी सुसंवाद साधून पाहणी करून नियोजन करण्यात आले असल्याचे व्यवस्थापक युवा कीर्तनकार विचारसागर महाराज लाहुडकर यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनी ( दि. २ ) श्रीक्षेत्र कुरवंडे येथे या इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा अंतर्गत पायी दिंडी परिक्रमेची घोषणा इंद्रायणी माता उगमस्थान पूजा, आरती, स्वच्छता करून संयोजक ह.भ.प. गजानन महाराज लाहुडकर यांचे हस्ते करण्यात आली होती. यावेळी ह.भ.प. भगवान महाराज पवार, निवृत्ती महाराज कदम, ह.भ.प. विचारसागर महाराज लाहुडकर, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, कुरवंडे ग्रामस्थ मार्गदर्शक सुभाष पडवळ प्रमुख आदी उपस्थित होते.
परिक्रमेत मोफत सर्व व्यवस्था ; सहभागाचे आवाहन
इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा अंतर्गत पायी दिंडी परिक्रमेत समाज प्रबोधन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात सहभागी होणाऱ्या भाविक, वारकरी, नागरिकांची भोजन, निवास व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. या इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यात तसेच समाज प्रबोधन उपक्रमात सर्वानी सहभाग व्हावे असे आवाहन ह. भ. प. गजानन महाराज लाहुडकर यांनी केले आहे. परिक्रमेत सहभागी होण्यासाठी अध्यक्ष श्री जोग महाराज प्रासादिक दिंडी क्र. ६९ ( श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ) ह.भ.प. विचारसागर महाराज लाहुडकर आणि नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे कडे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.