आळंदीत पोलीस प्रशासना तर्फे सेवा सुविधांची पाहणी
आळंदी कार्तिकी यात्रा २०२३ यात्रेत सुरक्षिततेस प्राधान्य
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या वारकरी भाविकांसह नागरिकांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, महसूल, पोलीस आणि आरोग्य सेवा प्रशासन तयारी करीत असून आळंदीत सुरु असलेल्या सोयी सुविधा सेवांच्या विकास कार्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अंतर्गत अधिकारी, पदाधिकारी यांनी केली. भाविक, वारकरी यांना यात्रा काळात गैरसोयीस सामोरे जावे लागू नये यासाठी प्रत्येक्ष स्थळ पाहणी करीत संबंधित यंत्रणे कडून माहिती जाणून घेत संवाद साधला. आळंदी कार्तिकी यात्रे अंतर्गत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे.
या पाहणी दौऱ्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सह पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त ( परिमंडळ ३ ) संदिप डोइफोडे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ, व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे आदींनी नियोजन पूर्व तयारी कामाची पाहणी करीत कामाचा आढावा घेतला. पिपंरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे माध्यमातून आळंदी यात्रेसाठी होत असलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. कार्तिकी यात्रा उत्सव उत्साहात, भक्तिमय वातावरणात, शांततेत निर्विघ्न पार पडवा साठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वतीने करण्यात आलेल्या नियोजनात सेवा-सुविधासह शांतता, सुव्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त प्रभावी पणे तैनात करण्यात येणार आहे. यात भाविक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले आहे.
पोलीस बंदोबस्त नियोजन
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया तर्फे आळंदी बंदोबस्तासाठी सहा. पोलीस आयुक्त ६, पोलीस निरीक्षक- ३४ पोलीस उपनिरीक्षक – १४७, पोलीस अंमलदार ८५५, वाहतूक पोलीस अंमलदार – २८०, होमगार्ड ९५० असा बंदोबस्त रहाणार आहे. एसआरपीएफ च्या २ कंपन्या, एनडीआरएफ ची १ तुकडी, बीडीडीएस चे २ पथके मदतीला तैनात राहतील.
पास व्यवस्था
कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने भाविकांचे वाहनांकरिता पिवळ्या रंगाचा व स्थानिकांचे वाहनांसाठी गुलाबी रंगाचा असे वेगवेगळे पास तयार करण्यात आले आहेत. ज्या भाविकांना व स्थानिक नागरिकाना पास पाहिजे त्यांनी आळंदी पोलीस स्टेशन ला गाडीचे आरसीबुक व ड्रायव्हर लायसन्स सह अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत दि. ०८, ०९, १०, ११ तारखांना आळंदी शहरात रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांसह भाविकांना आपली वाहने ०८ तारखेच्या आत पार्किंगचे ठिकाणी
लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुन्हा वाहने बाहेर आणू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्तिकी यात्रेच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. आळंदी शहरात येणारे रस्त्यावरुन वारकरी भाविकांच्या दिंडयांची वाहने तसेच अत्यावश्यक सेवा सुविधांची वाहने वगळून इतर वाहनांना आळंदी शहराकडे प्रवेश बंदी व पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भाविकांचे मालमत्ता संरक्षण व सुरक्षेसाठी नियोजन यामध्ये कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर व आळंदी शहर तसेच परिसरात सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कॅमेरे व्दारे संपूर्ण यात्रेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सुंपर्ण यात्रेत अनाऊसिंग सिस्टम बसविण्यात आली आहे. कॅमे-यांचे कंन्ट्रोल रुम पोलीस स्टेशन ला असून पोलीस स्टेशन मधुनच सीसीटीव्ही व्दारे अपप्रवृत्तीवर लक्ष ठेवुन अनाऊंसिंग सिस्टम व्दारे भाविकांना सुरक्षे विषयक सुचना देण्यात येणार आहेत. भाविकांचे मदतीस आळंदी शहरातील प्रत्येक चौकामध्ये पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. या ठिकाणाहून भाविकांना मदत मार्गदर्शन सुचना देण्यात येणार आहेत. यात्रे निमित्त येणारे दिंडयांचे ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग होईल. यात्रा काळात आळंदी शहरात रस्त्यावर, फुटपाथवर हातगाडी फेरीवाले, पथारीवाले हॉकर्स यांचे मुळे भाविकांची चेंगरा चेंगरी होण्याची शक्यता लक्षांत घेऊन उपाय योजना करण्यात आल्या आहेत. ८ हॉकर्स स्कॉड तयार करण्यात आले आहेत. सदरचे स्कॉड व आळंदी नगरपरिषद अतिक्रमण पथक असे एकत्रात प्रभावी कामगिरी करुन बेकायदेशीर हॉकर्स यांचे माल जप्त करणार आहे. त्यामुळे पथारीवाले हातगाडीवाले, फेरीवाले हॉकर्स यांनी रस्त्यावर तसेच फुटपाथवर न बसता आळंदी नगरपरिषदेने ठरवुन दिलेल्या ठिकाणीच दुकाने लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आळंदीत पोलीस मदत केंद्र तैनात राहणार असून भाविकांना काही अडचण, समस्या आल्यास तात्काळ उपाय योजना म्हणुन नजीकचे पोलीस मदत केंद्र अथवा ११२, १०० नंबर वर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय भाविकांचे सेवेत कायम तत्पर व सतर्क राहील असे आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.