पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी मोहन शिंदे
ग्रंथालय संघाचे राज्य स्तरीय अधिवेशन आळंदीत होणार
आळंदी : पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी आळंदी येथील श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांची निवड पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह सोपानराव पवार यांनी घोषणा केली. या सभेत ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन आळंदीत घेण्याचे ठरावास सर्वानुमतें मंजुरी देण्यात आली.
या प्रसंगी व्यासपीठावर मावळते अध्यक्ष विजय कोलते, काका चव्हाण, मार्कंडेय मीठापल्ली, राजू घाटोळे, चंद्रशेखर कपोते, राजेंद्र ढमाले, विलास चोंदे, रमेश सुतार, आळंदी शहर शिवसेना प्रमुख राहुल चव्हाण, अर्जुन मेदनकर, एम. डी पाखरे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा येथील जिल्हा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. मावळते अध्यक्ष विजयराव कोलते यांनी मोहन शिंदे यांचा शाल श्रीफळ देऊन नवनिर्वाचित अध्यक्षांचे स्वागत केले. अध्यक्षीय भाषणामध्ये मोहन शिंदे यांनी माझ्यावर सर्व संचालकांनी जी जबाबदारी दिली आहे. त्या जबाबदारीला मी न्याय देण्याचं काम करेल. पुणे जिल्ह्यात साडे सहाशे ग्रंथालय शासनमान्य असून आळंदी येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे भव्य आणि दिव्य अधिवेशन घेण्याचे नवनिर्वाचित अध्यक्षांनी यावेळी जाहीर केले. आळंदी येथे अधिवेशन घेण्याचे कारण की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीत अधिवेशना निमित्त राज्यातील हजारो ग्रंथालयांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. त्यांचे राहण्याची अशी उत्तम प्रकारे व्यवस्था केली जाईल. अधिवेशनाच्या प्रारंभी हजार वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिंडी प्रदक्षणा मार्गाने ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रदक्षणा करून अधिवेशना स्थळी पोहोचेल. सांगली, सोलापूर, कोल्हापूर ग्रंथालयांच्या कार्यकर्त्यांनी आळंदी येथे अधिवेशन व्हावे असा आग्रह धरलेला आहे. आळंदी येथे राज्यातून येणाऱ्या सर्व ग्रंथालय प्रेमींची व कार्यकर्त्यांची निवासाची व्यवस्था उत्तमरीत्या होऊ शकते. सर्वांनी आळंदी येथे अधिवेशन व्हावे अशी इच्छा प्रगट केली त्याला नवनिर्वाचित अध्यक्षांनी आळंदीत अधिवेशन घेण्याची सर्वांच्या सहकार्याने पूर्ण जबाबदारी स्वीकारली. मी अध्यक्ष व्हावे असे पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार यांची खूप दिवसापासून ची इच्छा होती. पण त्या अध्यक्ष पदाला न्याय देता आला पाहिजे. अध्यक्षपद हे निस्त मिळवण्यास नाही, तर ते काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवता आला पाहिजे. जर आपल्याला वेळ आणि कामाचा ठसा उमटवता आला नाही तर त्या अध्यक्षपदाला आपण न्याय देऊ शकणार नाही म्हणून आजपर्यंत मी ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हतो. पण सर्वांच्या प्रेमापोटी सोपानराव पवार यांनी सुचवल्याप्रमाणे मी या पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्याला मी योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे शिंदे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, उपाध्यक्षपदी हनुमंत देवकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. यावेळी जिल्हा व पुणे विभागीय संघ स्तरावरील मान्यवर उपस्थित होते. श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांचे हस्ते नवनियुक्त अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट अध्यक्ष अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे, गोविंद ठाकूर तौर, सचिन महाराज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. अलीकडे लोक पुस्तक वाचत नाहीत. वाचन संस्कृतीचे जतन होणे आवश्यक आहे. सत्कार बुके ऐवजी बुक भेट देवून वाचन संस्कृती जोपासण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा आणि विभागीय स्तरावरील नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे सत्कार उत्साहात झाले. रमेश सुतार यांनी आभार मानले.