बेघरांना मिळणाऱ्या जागेसाठी १९ सप्टेबरला
अबकड प्रपत्र दाखल करणार : दिपक ताटे,.
चाकण : प्रतिनिधी
भूमिहीन, भाडेकरू व बेघर नागरिकांना राहाण्यासाठी सरकारी एक गुंठा जागा देण्याचे शासनाकडून निश्चित झाले आहे. त्यामुळे भापसेच्या माध्यामातून गुरुवारी ( दि. १९ सप्टेबर ) पुण्याच्या जिल्हाधिका-यांकडे बेघर लाभार्थ्यांचे विहित नमुन्यातील अ ब क ड प्रपत्र तातडीने दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भापसे पार्टीचे अध्यक्ष दिपक ताटे यांनी येथे दिली.
भापसे पार्टीच्या वतीने चाकण येथे बेघर नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ” अबकड प्रपत्र तपासणी व कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यात ” ताटे यांनी ही माहिती दिली. भापसे पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री ताटे ह्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी भापसे पार्टीचे कोकण विभाग प्रमुख राजेश गौडा, लता गायकवाड, अलका सुरवसे, पुनम बट्टू, जिजाबाई कांबळे, शुभांगी नरळकर, जयश्री कांबळे, अनिता इनामदार, शिल्पा शिंदे, अनिता ओव्हाळ, हिरा कदम, अंजली देशमुख, उषा जाधव, अनुसया भालेराव, शालन सोनवणे, शांता पखाले, संजीवनी महापुरे, राजेश पदमने, वसंत पखाले, भारत इंगोले, रामप्रसाद माने, संदीप माने, प्रवीण पाटोळे, रमेश गालफाडे, समाधान ताटे, जालिंदर उपाडे, धीरज ताटे, दिनेश अहिरे आदींसह खेड तालुक्यातील बेघर नागरिक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी दिपक ताटे व जयश्री ताटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर बेघर नागरिकांच्या वतीने ताटे दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला.
ताटे पुढे म्हणाले,” खेड तालुक्यातील चांदूस येथे हजारो बेघर नागरिकांना राहण्याकरिता सरकारी एक गुंठा जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून मौजे चांदूस येथील सरकारी जमीन गट नं. १४२, ५९१ व ४७४ ही शासकीय जागा मोजणीचे आदेश खेडचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिका-यांना दिले आहेत. पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम व विभागीय आयुक्त रामचंद्र शिंदे यांनी देखील जिल्हा अधिक्षक कार्यालयास जागा मोजणी करण्यासंदर्भात तातडीची कारवाई करण्यात यावी, असे लेखी व स्पष्ट आदेश दिले आहेत. विहित प्रणालीचा अवलंब करून चांदूस येथील वरील गटाची सरकारी जागा जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार खेड प्रशासनाकडून तातडीने मोजून मिळणार आहे.”
जयश्री ताटे यावेळी म्हणाल्या,” जिल्हाधिकाऱ्यांकडे गतवर्षी दि. १७ ऑगस्ट, २०२३ रोजी ६५८ बेघर लाभार्थ्यांचे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे त्यांचे ” अ ब क ड ” प्रपत्र बुधवार दि. १८ सप्टेबर, २०२४ पर्यंत भरून घेतले जाणार आहेत. अबकड प्रपत्र भरण्यासाठी लाभार्थ्यांनी भापसे पार्टीच्या पक्ष कार्यालयाशी त्वरित संपर्क साधून आपले अ ब क ड प्रपत्र तातडीने भरावे. खेड तालुका प्रशासनाच्या आदेशानुसार गुरुवारी ( दि.१९ सप्टेबर, २०२४ ) जिल्हाधिका-यांकडे दुसऱ्या टप्प्यासह कागद पत्रांची पूर्तता केलेल्या बेघर लाभार्थ्यांचे विहित नमुन्यातील अबकड प्रपत्र दाखल करण्यात येणार आहे.”