कनेरसर ग्रामस्थांचे एमआयडीसी कार्यालय,पुणे येथे आंदोलन.
सत्यविचार न्यूज :
~ कनेरसर ता.खेड येथील सर्व गायरान जागा औद्योगिकीकरणासाठी संपादित झाल्याने यात्रा व सार्वजनिक उपक्रम यासाठी कोणतीही जागा शिल्लक नसल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे,यात्रा कमिटी अध्यक्ष दिलीपराव माशेरे,कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी, तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेश माशेरे,सामाजिक कार्यकर्ते अमित खरपुडे,नितीन ताम्हाणे,लक्ष्मण ताम्हाणे,तान्हाजी हजारे,कुंडलिक माशेरे,संपत हजारे,विश्वास दौंडकर यांनी एमआयडीसी कार्यालय,पुणे येथे धरणे आंदोलन केले.यावेळी उपजिल्हाधिकारी तथा एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी डाॅ.अर्चना पठारे यांनी केईआयपीएलकडून अहवाल मागितला आहे.तसेच सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर महामंडळ मुख्यालयास सादर करू असे लेखी पत्र दिले.
तसेच चर्चेवेळी अशोकराव टाव्हरे यांनी कनेरसर गावाला यात्रा व इतर उपक्रमासाठी जागा नाही,केईआयपीएल ने गाव दत्तक घेऊन यात्रेसाठी जागा व इतर बाबींची पुर्तता करावी अशी मागणी केली.उद्योग सचिव डाॅ.हर्षदीप कांबळे व एमआयडीसी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.शिवाजीराव पाटील यांनी केईआयपीएल निर्णय घेइल असे सागितले होते,परंतु केईआयपीएलने एमआयडीसी व शासनाने कार्यवाही केली पाहिजे असे कळविले असल्याने न्यायाची मागणी केली.
डाॅ.अर्चना पठारे यांनी सकारात्मक भुमिका घेऊन मुख्यालयाकडून लेखी निर्देश प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करू असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
एमआयडीसीच्या क्षेत्र व्यवस्थापक शिरीन शेख,वरिष्ठ सर्वेक्षक सुर्यकांत हंकारे यांनी आंदोलनस्थळी येऊन लेखी पत्र दिले,त्यानुसार ग्रामस्थांनी धरणे आंदोलन स्थगित केले.