‘मविआ’ मध्ये खेड आळंदीची जागा मित्र पक्षाला सुटणार?, विधानसभेसाठी ‘आप’ मधून मयुर दौंडकर इच्छूक,
चाकण : प्रतिनिधी
लोकसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महाविकास आघाडीने विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुका देखील महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडी एकत्रित लढण्याची चिन्हे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी कॉंग्रेससह आम आदमी पार्टीच्या नेत्यांचीही भेट घेतली आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील हजर होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुक इंडिया आघाडी एकत्रित लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राज्यातील २८८ जागांपैकी १५६ मतदारसंघाचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यातील काही जागा मित्र पक्षांना सोडल्या जातील. यावरही विचार सुरू आहे.
लोकसभेत महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडी एकसंध लढल्याने ४८ पैकी ३१ जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे विधानसभा निवडणुका देखील एकत्रित लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे. यातच काही जागा मित्र पक्षांना सोडल्या जाणार आहेत. आम आदमी पार्टीला पाच ते सहा जागा देणार असं बोललं जात आहे. यामध्ये खेड आळंदीचीही जागा महाविकास आघाडीत मित्र पक्षांना दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खेड आळंदी विधानसभा मतदार संघात आमदार दिलीप मोहिते पाटील सध्या अजित पवार गटात आहेत. महायुतीत दिलीप मोहिते पाटलांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत या जागेवरून मोठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. शरद पवार गटाकडून अतूल देशमुख यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. याचसोबत महाविकास आघाडीतील सुधीर मुंगसे व बाबाजी काळे हे इच्छूक आहेत.
दरम्यान, खेड – आळंदीची जागा आम आदमी पार्टीला सोडण्यात यावी, अशी स्थानिक नेत्यांनी महाविकास आघाडीकडे मागणी केली आहे. खेड आळंदी मतदार संघातून आम आदमी पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष मयुर दौंडकर यांनी तयारी सुरू केली आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. मयुर दौंडकर यांनी लोकसभेत शरद पवार गटातील उमेदवार डाँ. अमोल कोल्हे यांचाही जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत खेड – आळंदीची जागा ‘ आप ‘ ला सुटल्यास येथून मयुर दौंडकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.