गुणवत्ते सोबतच सामाजिक ज्ञान महत्वाचे – अनिल गुंजाळ
सत्यविचार न्यूज :
खेड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व मी सेवेकरी फाऊंडेशनच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न
राजगुरुनगर : आयुष्यात गुणवत्तेबरोबर सामाजिक ज्ञान अतिशय महत्वाचे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर केल्यावर जीवन यशस्वी आणि सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही असे मत राज्य परीक्षा परिषेदेचे माजी आयुक्त अनिल गुंजाळ यांनी व्यक्त केले.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/07/1000627282-1024x681.jpg)
खेड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व मी सेवेकरी फाऊंडेशन यांच्या वतीने वाकी येथील साईकृपा लॉन्स मध्ये आयोजित दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात गुंजाळ बोलत होते. यावेळी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे, मी सेवेकरी फौंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे , जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर , विश्वस्त शिवाजी किलकिले ,राष्ट्रपती पुरस्कृत मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे, उपाध्यक्ष मधुकर नाईक , तालुका संघाचे अध्यक्ष संजय बोरकर ,सचिव रामदास पवार, जिल्हा संघाचे उत्तम पोटवडे,रामदास व्यवहारे,दत्तात्रय मांजरे, किसन धंद्रे ,अंकुश सांडभोर, छाया लाटे ,संध्या कांबळे,रवींद्र चौधरी,विषयतज्ञ दयानंद शिंदे आदी मान्यवरांसह सुमारे ५७० विद्यार्थी ,शिक्षक पालक उपस्थित होते.
यावेळी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे म्हणाले की, कष्ट, चिकाटी आणि सातत्य याच्या जोरावर जीवन यशस्वी करता येते. प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करून कष्टाने ध्येय गाठता येते. त्यामुळे कोणत्याही प्रसंगात न खचता सातत्य ठेवा, असे आवाहन लांडे यांनी विद्यार्थ्यांना केले.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/07/1000627300-1024x681.jpg)
मी सेवेकरी सोशल फाऊंडेशनच्या वतीनं या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मागचा उद्देश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे यांनी स्पष्ट केला. मुंगसे म्हणाले की, आमच्या फाऊंडेशनच्या वतीनं भव्य बैलगाडा शर्यती,महाआरोग्य शिबीर ,मोफत विविध तीर्थक्षेत्र भेटी ,गावोगावी रुग्णवाहिका ,शासकीय दाखल्यांसाठी सुविधाकेंद्र आपल्यादारी,इंद्रायणी स्वच्छता , रोजगार मेळावा,वारीत साहित्य वाटप,शालेय विद्यार्थी व गरीब होतकरू महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण आदी सामाजिक कामे करत आहोत. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हे आम्हाला आमचं कर्तव्य वाटत. उद्याच्या उज्वल भवितव्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत सामाजिक बांधिलकी जपावी, जेणे करून चांगला समाज निर्माण होईल.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/07/1000627288-1024x681.jpg)
कार्यक्रमासाठी स्वागतगीत भामचंद्र विद्यालयाचे नामदेव पडदुणे ,रोहिदास लोहकरे ,चंद्रकांत बुट्टे, भालेराव कड व विद्यार्थी यांनी तर रामदास रेटवडे ,माळशिरसकर योगेश वायकर बाळासाहेब आदलिंगे विलास ,मनीषा अरगडे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बोरकर यांनी केले. सूत्रसंचालन रामदास पवार, लतीफ शेख यांनी तर रवींद्र चौधरी आभार व्यक्त केले.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/07/1000627294-1024x681.jpg)