श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा साजरी
श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न
सत्यविचार न्यूज :
प्रशालेच्या विविध विभागातील विविध शालेय (एस.एस.सी. व एच.एस.सी. बोर्ड परीक्षा) व शालाबाह्य (स्कॉलरशिप, एन. एम. एम. एस., एम. टी. एस., सारथी इ.) परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश प्राप्त करून संस्था व शाळेचा सन्मान वाढविला. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व गुणी व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, ट्रॉफी, प्रशस्तीपत्र, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. इयत्ता १० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानाप्रसंगी मालाबार गोल्ड व डायमंड पिंपरी यांच्या वतीने aपार्कर पेन व कॉफी कप देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प. पु. प्रशांतऋषीजी म. सा. (धर्मप्रभावक व वाणीभूषण) समवेत ज्ञानेश्वर तापकीर (मा. नगरसेवक पुणे मनपा व अध्यक्ष योगीराज पतसंस्था बाणेर, पुणे), ओंकार नितीन देव (मुख्य विश्वस्त – महागणपती देवस्थान, ट्रस्ट रांजणगाव) किशोर माने (संचालक – शिवकृपा नागरी पतसंस्था मुंबई व अध्यक्ष – स्व. कृष्णराव माने विद्या प्रतिष्ठान धानोरी, पुणे), कुमारी गौरीशंकर देवरे (आय. आर. एस. आळंदी देवाची), भोसले साहेब (मॅनेजर – शिवकृपा पतसंस्था), अशोक मुरकुटे, मालाबार गोल्ड व डायमंड पिंपरीचे नेहा मलगेकर व त्यांचे सहकारी, मांडगे महाराज समवेत संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता गावडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष (प्राथ.) डॉ. विवेक चव्हाण सहसचिव (माध्य.) मनीषा केदार, शिक्षक, पालक, विद्यार्थी आदी मोठ्या उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये अजित वडगावकर यांनी दरवर्षी विद्यालयात गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी व मागील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजित केले जाते असे सांगितले. संस्थेची यशस्वी परंपरा तसेच प्रशाला व प्रशालेतील शैक्षणिक साधनांचा उपयोग करून प्रशालेचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा व्यक्त करत संस्थेचा सन्मान वाढविणाऱ्या गुणवंतांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व संबंधित पालकांचे अभिनंदन केले.

गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे तसेच शिक्षक व शिक्षिका यांचे विद्यार्थ्यांकडून औक्षण करून पूजन करण्यात आले.
सुरेश वडगावकर, दीपक मुंगसे यांनी विद्यालयाची गौरवशाली निकाल परंपरा सांगत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी मनोगतामध्ये इयत्ता दहावीतील प्रथम आलेली विद्यार्थिनी शिवाजंली वीर हिने आपल्या यशामध्ये संस्था, विद्यालयातील ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ सारखे संस्कारक्षम उपक्रम तसेच शिक्षक व पालक यांचे कष्ट असल्याचे सांगून सर्वाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. नंतर कुमारी गौरीशंकर देवरे यांनी आपल्या मनोगतातून शालेय विद्यार्थ्यांना यू.पी.एस.सी. परीक्षेचे महत्त्व सांगताना या स्पर्धा परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जातात याविषयी सखोल माहिती दिली. फक्त हुशार मुलेच ही परीक्षा देऊ शकतात हा गैरसमज असून मनात जर जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणीही परीक्षा देऊ शकतो असे सांगितले. आयुष्यात नेहमी छंदाला वाव द्यावा असे सांगून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ज्ञानेश्वर तापकीर यांनी अजित वडगावकर यांचे कर्तुत्व महान असल्याचे सांगत या कार्यक्रमांमध्ये मी नाहून गेलो असे सांगितले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी खचून न जाता घडले पाहिजे असा सल्ला देत इयत्ता दहावीत द्वितीय आलेल्या गीता अर्जुन रासकर या विद्यार्थिनीस दत्तक घेऊन तिला डॉक्टर होण्यासाठी लागणारा सर्व खर्च करण्याची जबाबदारी घेतली. किशोर माने यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना घडविणाऱ्या सर्व गुरूंचे कौतुक केले. व पतसंस्थेच्या माध्यमातून एस.एस.सी. परीक्षेत ९०% पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी हजार रुपये देण्याचे जाहीर केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात प. पू. प्रशांत ऋषीजी म. सा. यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे स्वरूप पाहून मन भरून आल्याचे सांगितले. तसेच परोपकारासाठी जगणे हेच खरे जगणे आहे असे सांगत, संस्था व शिक्षक यांची निस्वार्थ सेवा असल्यामुळे या विद्यालयात असे गुणवंत विद्यार्थी तयार होत असल्याचेही सांगितले. ही प्रगती फक्त श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची नसून भारत देशाची आहे असे गौरवास्पद उद्गार काढले. व शेवटी मानवी जीवन कसे असावे हे अभंग गायनातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती व विकास शिवले यांनी केले. प्रदीप काळे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
