Mahavitaran | कान पिळल्यावरच महावितरणला जाग येणार का? विवेक वेलणकर यांचा सवाल
Vivek Velankar –
सत्यविचार न्यूज :
– महावितरणने (MSEDCL) जानेवारी २०२४ नंतर मासिक विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्द केले नसल्याची तक्रार ११ जुलै ला दुपारी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे केली होती. १२ जुलैला दुपारी महावितरणने तातडीने फेब्रुवारी व मार्च २०२४ या दोन महिन्यांचे विश्वासार्हतेचे निर्देशांक त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. प्रश्न हा उभा राहतो की ही माहिती तयार असून इतके दिवसांत संकेतस्थळावर का प्रसिद्ध केली नाही. दरवेळी कान पिळल्यावरच काम करायची सवय कधी जाणार? असा प्रश्न सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. (Vivek Velankar Sajag Nagrik Manch)
वेलणकर म्हणाले, अर्थात मार्च २०२४ चे प्रसिद्ध केलेले निर्देशांक जानेवारी २०२४ पेक्षा महावितरणचा कारभार आणखी ढासळल्याचे दाखवून देत आहेत. जानेवारी २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडामुळे वीज खंडित होण्याच्या १३००१ घटना घडल्या होत्या ज्या मार्च २०२४ मध्ये १६४४२ एवढ्या झाल्या . जानेवारी २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे सव्वादोन कोटी ग्राहकांना एकूण २३४३४ तास अंधाराचा सामना करावा लागला. तर मार्च २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे तीन कोटी ग्राहकांना एकूण २८०७६ तास अंधाराचा सामना करावा लागला.
महाराष्ट्रात महावितरणला सर्वात जास्त महसूल मिळवून देणार्या देशातील पहिली स्मार्ट सिटी म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या पुणे झोनची अवस्था काही वेगळी नाही.
जानेवारी २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण पुणे झोनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे वीज खंडित होण्याच्या ६८७ घटना घडल्या ज्यात पुण्यातील जवळपास बावीस लाख ग्राहकांना एकूण १४९६ तास अंधाराचा सामना करावा लागला. तर मार्च २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण पुणे झोनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे वीज खंडित होण्याच्या ८९१ घटना घडल्या ज्यात पुणे विभागातील एकतीस लाख ग्राहकांना एकूण २४७२ तास अंधाराचा सामना करावा लागला.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग हे विश्वासार्हतेचे निर्देशांक बघते का आणि ढासळत चाललेल्या सेवेच्या दर्जाबद्दल महावितरण ला जबाबदार धरून कधी कारवाई करणार का या प्रश्नांची उत्तरे ग्राहकांना मिळणे आवश्यक आहे. असे वेलणकर म्हणाले.