चाकण येथे सोमवारी मोफत सामुदायिक विवाह सोहळा.
स्व.आ.सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचा पुढाकार
सत्यविचार न्यूज :
स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान खेड तालुका व समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण येथे सोमवारी ( दि.२० मे) मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे व उद्योजक दत्तात्रय गोरे यांनी दिली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये सोमवारी सायंकाळी सात वाजता या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांनी लवकरात लवकर आपल्या मुला – मुलींची नावनोंदणी करावी, असे आवाहन नितीन गोरे यांनी केले आहे. त्यासाठी इच्छुकांनी वधू वरांचे आयकार्ड साईचे दोन फोटो, जन्मतारीख दाखला, मुलीचे वय १८ वर्षे तर मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असावे. विवाह नोंदणी तातडीने करावी. विवाह नोंदणीसाठी येथील स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन नितीन गोरे, विकास गोरे, दत्तात्रेय गोरे व मनीषा गोरे आदींनी केले आहे. या विवाह सोहळ्यासाठी आकर्षक व भव्य असा विद्युत रोषणाईने सजविलेला मंडप उभारण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची व जेवणाची खास सोय करण्यात आली आहे. विवाह सोहळ्याचे हे ३२ वर्ष असून, आतापर्यंत या विवाह सोहळ्यात पाच हजारहून अधिक जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. गरजूंनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.