Morgaon : वीजबिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यास आलेल्या तरुणाने महिला वीज कर्मचाऱ्याचा केला खून
मानवतेला काळिमा फासणारी घटना मोरगाव(बारामती) येथे घडली
अष्टविनायकातील सर्वात पहिला मयुरेश्वर गणपतीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या मोरगाव येथे एका विकृत तरुणाने महावितरणच्या महिला वीज कर्मचाऱ्याचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना आज(24 एप्रिल) रोजी घडली आहे.
रिंकू गोविंदराव बनसोडे(वय 34) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून त्या मूळच्या लातूर जिल्हयातील रहिवासी आहे.त्यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर(Morgaon) शोकांतिका पसरली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की,आज सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास आरोपी अभिजीत पोटे वीज बिल जास्त का आले म्हणून जाब विचारायला महावितरणच्या कार्यालयात गेला होता. वीज बिल जास्त येत आल्याची तक्रार महिला कर्मचारी घेत नसल्याच्या कारणावरून रागाच्या भरात आरोपीने महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात आणि शरीरावर कोयत्याने सपासप वर केले. कोयत्याने गंभीर वार बसल्याने उपचारादरम्यान महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याचा(Morgaon) मृत्यू झाला. त्यांच्यामागे १ वर्षाचा मुलगा असून त्या गेल्या दहा वर्षांपासून मोरगाव येथेच कार्यरत होत्या. मोरगाव येथे प्रथमोपचार केल्यावर त्यांना तातडीने पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.
307,302 कलम अंतर्गत गुन्ह्याची नोंद
बारामतीतील सुपे पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम 307 आणि 302 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.