चाकणला मुद्रांक शुल्काचा पाऊस,.
दुय्यम निबंधक कार्यालयात १४४ कोटी रुपये जमा,.
चाकण : प्रतिनिधी
चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षात नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क मिळून १४४ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. येथील कार्यालयाला मिळालेल्या इष्टांकाच्या तुलनेत आठ कोटी महसूल अधिक जमा केला आहे, अशी माहिती चाकणचे सहदुय्यम निबंधक विशाल काटे यांनी दिली. खेड तालुक्यात चाकण कार्यालयाने सर्वात जास्त मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क वसूल केली. गेल्या आर्थिक वर्षात १७ हजार २८४ दस्तांची नोंदणी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ मध्ये मुद्रांक शुल्क १३३ कोटी, तर नोंदणी शुल्क ११६ कोटी चाकण कार्यालयात जमा झालेली आहे. चाकण परिसराचा झालेला औद्योगिक विकास व वाढलेली गृह प्रकल्प, जमीन प्लॉटिंगच्या तेजीतील व्यवसायामुळे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात व्यवहार नोंदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. साधारणपणे दर महिन्याला दीड हजार दस्तऐवजांची नोंदणी होते. मात्र, सर्व्हर डाऊन अनेक वेळा होतो. त्यामुळे नागरिकांना अनेक तास कार्यालयात तिष्ठत राहावे लागते. मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणाऱ्या चाकण कार्यालयाकडे शासनाने अधिक लक्ष द्यावे, सोयी सुविधा द्याव्यात, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. मुद्रांक शुल्क हे जमीन, प्लॉट खरेदी, विक्री व्यवहार, सदनिकांचे व्यवहार, तारण, भाडेकरार अन्य शासकीय अथवा बँकांसाठी लागणा-या करारातून मोठ्या प्रमाणात जमा होते. जिल्हा प्रशासनातील मोठ्या प्रमाणात महसूल चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळतो.
——————————————————————
” सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे. याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतो. त्यासाठी शासनाने या कार्यालयात अत्यावश्यक व तातडीच्या सेवा सुविधा देणे गरजेचे वाटते.” – अनिकेत गोरे (उद्योजक, चाकण.)