चाकणला विद्याव्हॅली स्कूलमध्ये साकारले चैत्रांगण,.
सत्यविचार न्यूज :
चाकण : प्रतिनिधी
एस.पी.देशमुख शिक्षण संस्थेच्या येथील विद्याव्हॅली इंटरनेशनल स्कूल व विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ” चैत्रांगण ” साकारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मराठी महिन्याचे महत्त्व, निसर्गातील बदल व त्या मागील विज्ञानाची इत्यंभूत माहिती कळावी, या उदात्त हेतूने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती रणदिवे यांनी दिली.
आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक होणार असल्याने बालवयापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार होणे अपेक्षित आहे. त्यासाठी एस.पी. देशमुख शिक्षण संस्थचे अध्यक्ष शामराव देशमुख व सचिव रोहिणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. चैत्रांगणाची रांगोळी त्यात असणाऱ्या विविध प्रकारच्या चिन्हांचे महत्त्व रोहिणी वैद्य यांनी यावेळी सांगितले. या दिवशी देवी अन्नपूर्णाची विधिवत पूजा केली जाते. त्या अनुषंगाने हर्षदा जोशी यांनी अन्नपूर्णा स्तोत्र सादर केले. संस्थेच्या सचिव रोहिणी देशमुख यांनी याप्रसंगी वसंत ऋतुचे, मराठी महिन्याचे व चैत्रांगणाचे महत्त्व स्पष्ट केले. संस्थेचे अध्यक्ष शामराव देशमुख यांनी यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची माहिती अशा उपक्रमातूनच मिळते व येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृतीचे जतन करता येते, असे सांगितले. मोनाली नलावडे व वंदना सरनाईक यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक दिपक शिंदे यांनी आभार मानले.