चाकण येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी,.
भाविकांनी घेतला श्रवणसुखाबरोबर महाप्रसादाचा लाभ,.
सत्यविचार न्यूज :
चाकण येथे श्रीराम नवमी निमित्त श्रीरामनगर मित्र मंडळाच्या वतीने रामजन्मसोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. चाकण शहरातील मंदिरांमध्ये रामजन्म अनुभवण्यासाठी गर्दी करून भाविकांनी पाळणा हलवण्याचा सोहळा ” याचि देही याचि डोळा ” अनुभवला. श्रीरामनगर फेडरेशनसह येथील विविध सेवाभावी संस्था व संघटनांनी शहरात वाद्यवृंदाच्या गजरात मिरवणुका काढल्याने अवघा परिसर भक्तिरसात चिंब झाला होता.
चाकण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा पूजा कड – चांदेरे यांच्या नेतृत्वाखाली व उद्योजक साहेबराव कड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील श्रीरामनगर मध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी येथील राममंदिरात साहेबराव कड व अनिता कड यांच्या हस्ते श्रींची पूजा व अभिषेक करून सोहळ्याला प्रारंभ झाला. मंदिरात आकर्षक पुष्पसजावट, झुंबरांची आणि विविधरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भव्य मंडप उभारण्यात आला होता. रामजन्म सोहळ्यापूर्वी मंदिराच्या परिसरात पोशाखाची वाद्य वृंदाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर समाज प्रबोधनकार ह.भ.प. विलास महाराज वाघ यांची कीर्तनरुपी सेवा पार पडली. यावेळी श्रीरामनगर फेडरेशनचे अध्यक्ष साहेबराव कड यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. भाविकांनी यावेळी श्रवण सुखाबरोबर महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान, महिलांनी यावेळी राम जन्मावर आधारित पाळणा म्हटला.याप्रसंगी श्रीराम सोसायटीचे चेअरमन जयप्रकाश परदेशी, साहेबराव कड, अजित मुथा, बळीराम कड, सयाजी गांडेकर, वसंतराव कड, राजेंद्र खेडकर, चंद्रकांत गोरे, अनिकेत भूरूक, चंद्रकांत भूरूक, अशोक गांडेकर, सुभाष वाडेकर, शैलेश कड, अजय मनसुख, शुभम कड, विजय भोसले आदि उपस्थित होते. तसेच चाकण येथील यंग जॉली क्लब, खंडोबा माळावरही रामनवमी सोहळ्यानिमित्त शहरातून जंगी मिरवणुका काढून रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल – ताशांच्या गजरात, मर्दानी खेळांच्या उत्साहात मिरवणूका काढण्यात आल्याने चाकण शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. अवघा परिसर भक्तिरसात चिंब झाला होता.