चाकण बाजारात टोमाटो, कोबी व गाजराची प्रचंड आवक,. कांद्याची आवक व भावातही घसरण,.
सत्यविचार न्यूज :
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये टोमाटो, कोबी व गाजराची प्रचंड आवक झाली. बटाट्याची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. कांद्याची आवक घटूनही भावात घट झाली. गाजर, टोमाटो व कोबीची मोठी आवक झाली. तोतापुरी कैऱ्यांची किरकोळ आवक झाली. लसणाची आवक घटल्याने भावात वाढ झाली. फळभाज्यांच्या बाजारात वाटाणा व गाजर यांचे भाव स्थिर राहिले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व पालक भाजीची आवक वाढली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई व म्हशींच्या संख्येत वाढ होवूनही त्यांचे भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ५ कोटी, २० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ६ हजार ७५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५,२५० क्विंटलने घटूनही भावात १०० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव १,७०० रुपयांवरून १,६०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक १,४०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १०० क्विंटलने घटूनही बटाट्याचा कमाल भाव २,५०० रुपयांवर स्थिरावला. बंदूक भूईमुग शेंगा व जळगाव भुईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक २७ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ३ क्विंटलने घटल्याने भावात ३ हजार रुपयांची वाढ झाली. लसणाचा कमाल भाव १२ हजार रुपयांवरून १५ हजार रुपयांवर पोहोचला. हिरव्या मिरचीची एकूण आवक २९५ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ३० क्विंटलने घटल्याने भावात वाढ झाली. हिरव्या मिरचीला ५ हजार रुपयांपासून ते ६ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
* शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे – कांदा – एकूण आवक – ६,७५० क्विंटल. भाव क्रमांक १. १,६०० रुपये, भाव क्रमांक २. १,४०० रुपये, भाव क्रमांक ३. १,१०० रुपये. बटाटा – एकूण आवक – १,४०० क्विंटल. भाव क्रमांक १. २,५०० रुपये, भाव क्रमांक २. २,२०० रुपये, भाव क्रमांक ३. १,९०० रुपये.