चाकण भागात रसवंतीगृहांची दुकाने गजबजली,
सत्यविचार न्यूज :
दिवसेंदिवस सूर्य मोठ्या प्रमाणात आग ओकू लागल्याने त्रस्त झालेल्या नागरिक व ग्राहकांना उन्हापासून थंडावा मिळण्यासाठी चाकण शहर व परिसरात रसवंती गृहांची दुकाने गजबजली आहेत. त्यामुळे रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची पावले गृ-हांळांकडे वळू लागली आहेत. चाकण परिसरात सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुणे – नाशिक महामार्गावरील चाकण गावच्या हद्दीत मोक्याच्या ठिकाणी व रस्त्यालगत जागोजागी रसवंती गृहांची दुकाने सजली आहेत. उन्हामध्ये विश्रांती म्हणून शरीराला थंडावा मिळण्या करिता उसाचा ताजा रस घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. जानेवारी महिन्यापासूनच उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. परंतु फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याने सध्या नागरिकांना भर दुपारी घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. दैनंदिन कामे करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला उन्हाळा असला तरी देखील घराबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे अनेकजण थंड रस पिण्यावर भर देत आहे. भर उन्हात प्रवास करून थकलेले प्रवाशी आता रसवंती गृहांमध्ये उसाचा रस घेण्यासाठी गर्दी करू लागल्याने दुकानामध्ये वर्दळ वाढत असल्याचे अनिकेत गोरे व अनिता गोरे यांनी सांगितले.
—————————————-
” कडक उन्हाळा सुरू झाल्याने थंड उसाच्या रसासाठी ऊस, बर्फ व लिंबू यांचे भाव कडाडले आहेत. एखाद्या दिवशी नफा होतो, तर एखाद्या दिवशी तोटाही सहन करावा लागतो. त्यामुळे हा व्यवसाय करणे जिकरीचे झाले आहे.” – अनिकेत गोरे, रसवंतीगृह चालक, चाकण.