Pimpri-Chinchwad Police News : नाकाबंदीत पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर पोलिसांच्या हाती लागली 50 लाखांची रोकड!
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने पैशाची मोठी उलाढाल सुरु झाली आहे.त्याला मंगळवारी लगेचच दुजोरा मिळाला.कारण पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील उर्से टोलनाक्यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पन्नास लाख रुपयांची बेहिशोबी रोकड पकडली. या निवडणुकीच्या अगोदर राज्यात हाती आलेले हे पहिलेच मोठे घबाड आहे.
निवडणुकीसाठीच ही रक्कम नेण्यात येत असल्याचा पोलिसांना संशय आहे. एका कारमध्ये ती नाकाबंदीदरम्यान त्यांना आढळून आली. त्याबाबत कारमधील तिघांना समाधानकारक खुलासा करता न आल्याने त्या कारसह स्थानिक शिरगाव पोलिसांनी जप्त केली. अशा प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे त्यात कारवाईचा वा ती सापडलेल्यांना अटक करता येत नाही. आयकर विभागाकडे ही रोकड देण्यात येणार असून पुढील तपास तेच करतील,असे स्थानिक डीसीपी बापू बांगर यांनी सत्यविचार ला सांगितले.
रोकड सापडलेले ठिकाण हे मावळ लोकसभा मतदारसंघात येते. तेथे युतीकडून (शिंदे शिवसेना) श्रीरंग बाऱणे, तर संजोग वाघेरे-पाटील यांची आघाडीकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) उमेदवारी जवळपास नक्की झाली आहे. गुरुवारी त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नऊ ठिकाणी नाकाबंदी मंगळवारी लावली होती.
उर्से टोलनाक्यावर स्थानिक शिरगाव पोलिस ठाण्याचे पीएसआय नईद शेख आणि पथक त्याकरिता तैनात होते. त्यांनी मुंबईकडून पुण्याकडे येणाऱी संशयास्पद स्कॉर्पिओ कार अडवली. त्यात तिघेजण होते. त्यांच्याकडे पन्नास लाखांची रोकड सापडली. त्याबद्दल योग्य तो खुलासा त्यांना करता न आल्याने ती पोलिसांनी ही रक्कम जप्त केली.