..अन्यथा मावळ लोकसभेत शिवसेनेच्या उमेदवाराचे काम आम्ही करणार नाही; पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी आक्रमक
सत्यविचार न्युज :
शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे वारंवार उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बरसत आहेत. पण आता शिवतारेंना समज द्या, अजितदादांची माफी मागायला लावा. अन्यथा मावळ लोकसभेत शिंदे गटाकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवाराचे काम पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस करणार नाही असा इशारा अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, फजल शेख आदी उपस्थित होते.
अजित गव्हाणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये आहे. महायुती म्हणून लोकसभा निवडणुकीला एकत्रित सामोरे जायचे आहे. महाराष्ट्रातून महायुतीच्या ४५ जागा निवडून आणण्यासाठी काम करत आहोत. परंतु, बारामतीमध्ये पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्या विधानामुळे आम्ही नाराज आहोत. कार्यकर्ते संतप्त आहेत. आमच्या नेत्यांबाबत अतिशय चुकीची विधाने त्यांच्याकडून केली जात आहेत. त्यांच्या विधानामुळे महायुतीला तडा जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मावळच्या जागेवर दावा आहे. परंतु, महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटली आणि शिवतारे यांची अशीच भूमिका राहिली. तर, मावळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणार आहोत.
शिवतारे यांनी अजित पवार यांची माफी मागावी. जोपर्यंत माफी मागत नाहीत. तोपर्यंत आम्ही मावळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत. राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही अशीच भूमिका घेतील. शिवतारे यांनी माफी मागितल्यास मावळमध्ये युतीचा धर्म पाळला जाईल. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहे. त्यांनी बारामतीत मोठी विकास कामे केली आहेत. त्यामुळे बारामतीत आमचा उमेदवार निवडून येईल, याची आम्हाला खात्री आहे, असेही ते म्हणाले.